आपण दिवसभर राबतो ते फक्त दोन घास पोटासाठी, पण तेच अन्न जर आपण रागाने, भांडण करून खात असू तर त्या राबण्याचा काय उपयोग, हेच आजच्या लेखात आपण पाहणार आहोत.
ताटावरून रागाने उठणे का वाईट आहे
प्रत्येक घरात ही चूक घडते. घरातला माणूस जेवायला बसला की लगेच किरकिर सुरू होते. पती पत्नीचे भांडण, मुलांना रागावणे, पैशाचा विषय काढणे. शब्दाला शब्द वाढतो आणि एखादा माणूस रागाने ताटावरून उठून जातो. अन्न तसेच ताटात राहते.
शास्त्रात याला अन्नपूर्णेचा अपमान म्हटले आहे. जेवणावरून रागाने उठणारी व्यक्ती आणि त्याला उठायला भाग पाडणारी व्यक्ती, दोघांनाही अन्नाचा शाप लागतो. यानंतर हळूहळू घराला उतरती कळा लागते, घरात भांडणे वाढतात आणि बरकत राहत नाही.
जेवताना या चुका करू नका
1. घरचा कर्ता पुरुष किंवा स्त्री जेवत असेल तर त्याला त्यावेळी घरच्या अडचणी सांगू नका. त्याला शांतपणे चार घास खाऊ द्या.
2. शत्रू जरी जेवत असेल तरी त्याला सुखाने खाऊ द्या, त्यावेळी काहीही बोलू नका, हा शास्त्राचा नियम आहे.
3. मतभेद असतील तर जेवण झाल्यावर बोला, ताट समोर असताना अपशब्द काढू नका आणि कोणाला सल्ला पण देऊ नका.
मुक्या प्राण्यांना मारू नका
कधी कधी गरीब माणूस भूक लागली म्हणून भाकरी, वडा, समोसा चोरून खातो आणि लोक त्याला मारतात. तसेच मांजर दुध चोरून पिते म्हणून तिला मारतात. चोरी करणे चुकीचेच आहे पण त्या मुक्या जीवाला काय कळणार, एखाद्याच्या तोंडचा घास काढून घेणे म्हणजे शापाला आमंत्रण देणे आहे.
अन्न बनवतानाचे विचार अन्नात उतरतात
अन्न शिजवणारी, वाढणारी व्यक्ती जर रागात असेल, मनात वाईट विचार असतील तर ते विचार त्या अन्नात उतरतात. म्हणूनच मन शांत नसेल, रागात असाल तर स्वयंपाक करू नये आणि जेवू पण नये. हॉटेल असो, लग्न असो किंवा घर असो, शांत मनाने जेवले तरच ते आशीर्वाद ठरते.
म्हणूनच पूर्वी काय करायचे
जेवण्यापूर्वी ताटाभोवती पाणी फिरवून चित्राहुती दिली जाते. काही घास कावळा, चिमणी, गाय, कुत्रा यांच्यासाठी काढून ठेवला जातो. लग्न कार्यात ताटाभोवती रांगोळी काढतात. यामागचा हेतू एकच, अन्नपूर्णा देवी प्रसन्न राहावी, घर धनधान्याने भरलेले राहावे.
पंचमहायज्ञ काय आहे
ज्योतिष शास्त्रात सांगितले आहे की अन्नाच्या नासाडीचे दोष दूर करण्यासाठी रोज पंचमहायज्ञ करावा. म्हणजेच कावळे, चिमण्या, कबुतरे, कुत्री, मांजरे, गायी यांना थोडे तरी खायला घालावे. याने आपल्या कमाईला ऊर्जितावस्था येते. संकट काळात देव कोणाच्या तरी रूपाने आपले रक्षण करतो. अपघात टळतात. यालाच अतिथी देवो भव असे म्हणतात.
म्हणून लक्षात ठेवा, अन्न हे पूर्णब्रह्म आहे, त्याचा कधीही अपमान करू नका.