आरोग्य : रात्री झोपण्याआधी अनेकांना मोबाईल चार्जिंगला लावूनच रील पाहण्याची, गेम खेळण्याची किंवा व्हिडिओ कॉल करण्याची सवय असते. सकाळी उठल्यावर डोके जड होणे, डोकेदुखी, डोळे दुखणे आणि दिवसभर थकवा जाणवणे याचे कारण अनेकांना माहितीच नसते. ही सवय तुमच्या झोपेची आणि मेंदूची दोन्हीची वाट लावत आहे.
पुण्यातील न्यूरोलॉजिस्ट डॉ. अमोल पाटील सांगतात, मोबाईल चार्ज होत असताना त्यातून इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आणि उष्णता दोन्ही जास्त प्रमाणात बाहेर पडते. फोन कानाजवळ किंवा उशीजवळ ठेवून चार्जिंगला लावून वापरल्यास ही उष्णता थेट मेंदूपर्यंत पोहोचते. त्यामुळे मेंदूला आराम मिळत नाही आणि झोपेची सायकल बिघडते. यालाच टेक फटीग असे म्हणतात.
दुसरे कारण म्हणजे चार्जिंगला लावलेला फोन जास्त ब्राईट दिसतो. त्यातून निघणारा निळा प्रकाश म्हणजे ब्लू लाईट हा झोपेसाठी आवश्यक असलेल्या मेलाटोनिन हार्मोनला 50 टक्क्यांनी कमी करतो. त्यामुळे तुम्ही 8 तास झोपलात तरी झोप खोल लागत नाही. सकाळी उठल्यावर फ्रेश वाटत नाही आणि डोके दुखते.
1. झोप अपूर्ण राहणे - चार्जिंगमुळे फोन गरम होतो आणि सतत नोटिफिकेशनचा आवाज, व्हायब्रेशन यामुळे मेंदू अलर्ट मोडमध्ये राहतो. गाढ झोप लागत नाही. सकाळी उठल्यावर चिडचिड होते.
2. डोळे आणि मान दुखणे - चार्जिंगला लावून फोन हातात धरून पाहताना आपण मान खाली घालतो. यामुळे मानेवर ताण येतो आणि डोळ्यांवर निळ्या प्रकाशाचा थेट मारा होतो. सकाळी डोळे सुजल्यासारखे वाटतात.
3. स्फोटाचा धोका - स्वस्त चार्जर किंवा खराब बॅटरी असलेला फोन रात्रभर चार्जिंगला लावून वापरल्यास बॅटरी फुगते आणि आग लागण्याचा धोका असतो. अनेक घरांमध्ये उशीजवळ फोनचा स्फोट झाल्याच्या घटना घडल्या आहेत.