पुण्यात स्वारगेट चौकात तरुणाचा झाडावर गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न, अग्निशमन दलाने मानवी मनोरा करून वाचवले प्राण - टॉप न्यूज मराठी

पुणे : लक्ष्मीनारायण चौक स्वारगेट येथे आज दुपारी एका तरुणाने झाडावर गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळेत धाव घेत मानवी मनोरा करत या तरुणाचे प्राण वाचवले आहेत.

काय घडले नेमके 

पुणे अग्निशमन दलाला आज दुपारी 12.06 वाजता लक्ष्मीनारायण चौक स्वारगेट येथे एका व्यक्तीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा कॉल आला. मिळालेल्या माहितीनुसार MH-12-QG-3759 या वाहनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दुपारी 12.47 वाजता दल घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी उमेश गोकुळ मिरगणे राहणार शंकर महाराज मठ परिसर या इसमाने अंदाजे 18 ते 20 फूट उंच झाडावर नायलॉनच्या दोरीने गळफास घेण्याचा प्रयत्न केला होता. त्याच वेळी उपस्थित नागरिकांनी आरडाओरड केली.

जवानांनी दाखवले धाडस 

अधिकारी अमोल कर्डेकर, तांडेल राजेश कांबळे, ड्रायव्हर हातमोडे आणि फायरमन जवान विक्रम गायकवाड, जयेश गांगोडा, अमित रासकर, अथर्व काटे यांनी तात्काळ परिस्थितीचे गांभीर्य ओळखले.

शिडी लावण्यास वेळ लागेल हे लक्षात येताच जवानांनी मानवी मनोरा तयार केला. एका जवानाने वर चढत चाकूच्या साहाय्याने नायलॉनची दोरी कापली आणि तरुणाला सुखरूप खाली उतरवले. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून कोणताही धोका नसल्याची खात्री करण्यात आली आहे. या घटनेची माहिती सेंट्रल फायर स्टेशनला कळवण्यात आली असून दल गेटमध्ये परतले आहे.

या तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न का केला याचे कारण अद्याप समजू शकले नाही. पुढील तपास स्वारगेट पोलीस करत आहेत.