आरोग्य : हृदयविकार म्हटले की वयस्कर व्यक्ती डोळ्यासमोर येते. पण चित्र आता बदलले आहे. बदलती जीवनशैली, वाढता ताण, रात्रभर जागणे, व्यायामाचा अभाव, बाहेरचे खाणे, धूम्रपान आणि मद्यपान यामुळे पंचविशी तिशीतील तरुणांमध्ये सुद्धा हृदयाचे आजार दिसू लागले आहेत. त्यामुळे हृदयविकार हा फक्त वृद्धांचा आजार आहे हा समज आता सोडावा लागेल.
सततचा मानसिक ताण आणि अपुरी झोप हे सगळ्यात मोठे कारण आहे. दिवसभर लॅपटॉप समोर बसणे आणि शारीरिक हालचाल अजिबात नसणे, फास्ट फूड, जास्त मीठ, साखर आणि तेलकट पदार्थ खाणे, वाढते वजन आणि सुटलेले पोट, सिगारेट, तंबाखू, गुटखा आणि अतिमद्यपान, ब्लड प्रेशर वाढणे, कोलेस्टेरॉल वाढणे, मधुमेह आणि घरात आई वडिलांना किंवा जवळच्या नातेवाईकाला हृदयाचा आजार असणे ही अनुवंशिक जोखीम सुद्धा कारणीभूत ठरते.
प्रत्येक छातीत दुखणे म्हणजे हृदयविकार नसतो. पण काही त्रास वारंवार होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.
छातीत दडपण येणे, धडधड वाढणे, चालताना दम लागणे, अचानक खूप घाम येणे, चक्कर येणे, असामान्य थकवा जाणवणे ही लक्षणे असू शकतात.
जर छातीत तीव्र वेदना होऊन ती वेदना डाव्या हाताकडे, खांद्याकडे किंवा जबड्याकडे जात असेल, श्वास घ्यायला त्रास होत असेल, थंड घाम येत असेल, मळमळ होत असेल तर तात्काळ जवळच्या हॉस्पिटलमध्ये जाणे गरजेचे आहे. वेळ वाया घालवू नका.
हृदय निरोगी ठेवायचे असेल तर मोठे बदल करावे लागत नाहीत. रोजच्या छोट्या सवयी महत्वाच्या आहेत.
रोज किमान तीस ते पंचेचाळीस मिनिटे चालणे किंवा व्यायाम करणे, घरचे संतुलित जेवण, रात्री सात ते आठ तास पूर्ण झोप, ताण कमी करण्यासाठी मित्रांशी बोलणे किंवा आवडते छंद जोपासणे, धूम्रपान आणि तंबाखू पूर्णपणे बंद करणे.
तसेच तीस वर्षांनंतर वर्षातून एकदा ब्लड प्रेशर, शुगर, कोलेस्टेरॉल आणि वजन तपासून घेणे चांगले. घरात हृदयविकाराचा इतिहास असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने नियमित तपासणी करावी.
आयुर्वेदात दिनचर्या, ऋतुचर्या, योग्य आहार, नियमित व्यायाम आणि मन शांत ठेवणे याला महत्व दिले आहे. पण छातीत दुखत असेल तर फक्त घरगुती काढा किंवा आयुर्वेदिक औषधावर अवलंबून राहू नका. आधी हृदयरोग तज्ज्ञाचा सल्ला घ्या, ईसीजी आणि इतर तपासण्या करून घ्या.
मी अजून तरुण आहे मला काही होणार नाही हा गैरसमज सगळ्यात धोकादायक आहे. तरुण वयात हृदयाची काळजी घेतली तर पुढचे पन्नास वर्षे निरोगी जगता येते. आजपासूनच छोटे बदल करा, तेच मोठा फरक घडवतील.
डिस्क्लेमर - हा लेख फक्त जनजागृती आणि माहितीसाठी आहे. यातील माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नाही. कोणतीही लक्षणे जाणवल्यास स्वतः औषध घेऊ नका. आपल्या फॅमिली डॉक्टर किंवा हृदयरोग तज्ज्ञाचा सल्ला घ्या. उपचार घेण्यापूर्वी तज्ज्ञांचे मत घेणे आवश्यक आहे.