‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत विद्यार्थ्यांना करिअर, सायबर व रस्ता सुरक्षेबाबत मार्गदर्शन - टॉप न्यूज मराठी

पुणे : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह, विश्रांतवाडी, येथे विद्यार्थ्यांसाठी विविध जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. 

याअंतर्गत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, मेंटल कॉर्नर, पुणे येथे करिअर मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले. शिवचरित्रकार हसन सय्यद यांनी विद्यार्थ्यांना करिअरच्या विविध संधी, योग्य करिअरची निवड तसेच भविष्यातील शैक्षणिक वाटचाल याबाबत मार्गदर्शन केले.

तसेच सायबर सुरक्षा व रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. फलटण उपप्रादेशिक परिवहन अधिकारी  सचिन विधाते यांनी विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी घ्यावयाची काळजी, वाहतूक नियमांचे पालन, रस्ता सुरक्षा तसेच सुरक्षित वाहनचालना याबाबत मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमांना वसतिगृहातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. विद्यार्थ्यांमध्ये करिअरविषयक जागरूकता निर्माण करण्यासोबतच सायबर सुरक्षा आणि रस्ता सुरक्षेबाबत जबाबदार नागरिकत्वाची जाणीव निर्माण करण्याच्या दृष्टीने हे उपक्रम उपयुक्त ठरणार असल्याचा विश्वास गृहप्रमुख श्रीमती विजयश्री बाबर यांनी व्यक्त केला.