शिरूर नगरपरिषदेतर्फे ‘सेवा संकल्प’ अभियानांतर्गत विविध उपक्रम; स्वच्छता, कचरा वर्गीकरण, वृक्षारोपण आणि जलस्रोत संवर्धनावर भर - टॉप न्यूज मराठी

पुणे : शिरूर नगर परिषदेमार्फत ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत शहराच्या सर्वांगीण स्वच्छता व पर्यावरण संवर्धनासाठी विविध उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. शहरातील शाळा, नदीकिनारे, व्यावसायिक भाग तसेच विविध सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवून नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करण्यात येत आहे.

शहर स्वच्छ व कचरामुक्त ठेवण्याच्या उद्देशाने शाळा-महाविद्यालयांमध्ये तसेच घरोघरी कचरा वर्गीकरण, ओला-सुका कचरा व्यवस्थापन आणि घरगुती कंपोस्टिंग याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. नागरिकांनी कचऱ्याचे योग्य प्रकारे वर्गीकरण करून पर्यावरणपूरक कचरा व्यवस्थापनात सहभागी व्हावे, यासाठी नगर परिषदेकडून सातत्याने प्रबोधन केले जात आहे.

पर्यावरण संवर्धनाचा महत्त्वपूर्ण भाग म्हणून सोनार आळी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले असून, शहरातील इतर भागांतही आगामी काळात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर हरित क्षेत्र वाढविण्यासाठी नगर परिषदेकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.

यासोबतच शहरातील जलस्रोतांची स्वच्छता व संवर्धन यावरही विशेष भर देण्यात आला आहे. जलस्रोतांचे प्रदूषण रोखण्यासाठी नागरिकांचा सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.

गणेशमूर्तींच्या विसर्जनानंतर नदी, तलाव व इतर जलस्रोतांमध्ये निर्माल्य जाणार नाही, यासाठी निर्माल्य संकलनाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली. संकलित निर्माल्यापासून कंपोस्ट खत निर्मिती करण्यात येणार असून, कचऱ्याचे संसाधनात रूपांतर करण्याचा हा उपक्रम पर्यावरणपूरक कचरा व्यवस्थापनाला चालना देणारा ठरणार आहे. तसेच या अभियानांतर्गत मालमत्ता हस्तांतरण, जन्म व मृत्यू प्रमाणपत्र देणे, महिला बचत गट नोंदणी करणे, दिव्यांगांना यू.आय.डी. कार्ड देणे इत्यादी शिबीरे घेण्यात आली आहेत. 

स्वच्छ, सुंदर, हरित आणि पर्यावरणपूरक शिरूर घडविण्यासाठी नगर परिषद प्रशासनासोबत नागरिकांनीही सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन नगर परिषदेकडून करण्यात आले आहे. १७ ऑक्टोबर पर्यंत राबविण्यात येणाऱ्या ‘सेवा संकल्प’ अभियानाच्या माध्यमातून स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाची लोकचळवळ उभी करण्याचा नगर परिषदेचा संकल्प असल्याचे शिरूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. प्रितम पाटील यांनी सांगितले.