आजच्या व्यक्तिविशेषमध्ये आपण अशा व्यक्तीबद्दल बोलणार आहोत ज्यांचे नाव ऐकले की दहशतवाद्यांच्या मनातही धडकी भरते, ज्यांना भारतातील सर्वात यशस्वी सरकारी वकील म्हटले जाते. उज्ज्वल निकम .....
उज्ज्वल निकम यांचा जन्म 30 मार्च 1953 रोजी महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात झाला. त्यांचे वडील देवराव माधवराव निकम हे स्वतः न्यायाधीश आणि बॅरिस्टर होते तर आई विमलादेवी निकम या स्वातंत्र्य सैनिक होत्या. त्यामुळे लहानपणापासूनच घरात कायद्याचे आणि देशभक्तीचे वातावरण होते.
त्यांनी सुरुवातीला विज्ञान शाखेतून बीएससी केले आणि नंतर जळगावच्या केसीई सोसायटीच्या एस एस मणियार लॉ कॉलेजमधून एलएलबीची पदवी घेतली. त्यांचे लग्न ज्योती निकम यांच्याशी झाले आहे. त्यांना दोन मुले आहेत, मुलगा अनिकेत निकम हा सुद्धा मुंबई हायकोर्टात क्रिमिनल लॉयर आहे आणि मुलगी शर्वरी निकम हिने एक्सएलआरआय जमशेदपूरमधून शिक्षण घेऊन ती एचआर प्रोफेशनल म्हणून काम करते. निकम यांनी स्वतः अनेकदा सांगितले आहे की माझे वडील माझे पहिले गुरु होते, त्यांनीच मला सांगितले होते की वकील हा फक्त केस जिंकण्यासाठी नसतो तर पीडिताला न्याय मिळवून देण्यासाठी असतो.
उज्ज्वल निकम यांनी करिअरची सुरुवात जळगावमध्येच जिल्हा सरकारी वकील म्हणून केली. सुरुवातीला छोट्या मोठ्या सिव्हिल आणि क्रिमिनल केसेस लढायचे. पण त्यांची तयारी आणि पुरावे मांडण्याची पद्धत पाहून महाराष्ट्र सरकारने त्यांना विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्त केले. त्यांची पहिली मोठी केस होती 1993 सालचा नाशिक बॉम्बस्फोट. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. 30 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी 628 आरोपींना जन्मठेप आणि 37 आरोपींना फाशीची शिक्षा मिळवून दिली आहे.
1. 1991 कल्याण बॉम्बस्फोट - रवींद्र सिंगला शिक्षा मिळवून दिली, ही त्यांची पहिली मोठी यशस्वी केस होती.
2. 1993 मुंबई बॉम्बस्फोट - या खटल्याने त्यांचे आयुष्य बदलले. टाडा कोर्टात हा खटला तब्बल 14 वर्षे चालला आणि त्यांनी 100 हून अधिक आरोपींना शिक्षा मिळवून दिली. यात अनेकांना फाशी आणि जन्मठेप झाली. याच केसपासून त्यांना देशभरात ओळख मिळाली.
3. गुलशन कुमार हत्या प्रकरण 1997 - टी सिरीजचे संस्थापक आणि प्रसिद्ध संगीत निर्माते गुलशन कुमार यांच्या हत्येचा खटला.
4. प्रमोद महाजन हत्या प्रकरण 2006 - भाजपचे ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन यांची त्यांच्याच भावाने गोळ्या झाडून हत्या केली होती, या केसचे सरकारी वकील म्हणून निकम यांनी काम पाहिले.
5. 2008 मुंबई हल्ला, 26/11 केस - ही त्यांच्या आयुष्यातील सगळ्यात मोठी केस. एकमेव जिवंत पकडलेला दहशतवादी अजमल कसाब याला फाशीची शिक्षा मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. या केसनंतर त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात आली. लोक म्हणतात कसाबने बिर्याणी मागितली होती ही कथा निकम यांनीच कोर्टात सांगितली होती.
6. शक्ती मिल सामूहिक बलात्कार केस 2013 - मुंबईतील शक्ती मिलमधील बलात्कार प्रकरण.
7. कोपर्डी बलात्कार आणि हत्या केस 2016 - अहमदनगर जिल्ह्यातील या अत्यंत संवेदनशील केसने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता, या केस मध्ये पण त्यांनी पीडित कुटुंबाला न्याय मिळवून दिला.
8. बदलापूर लैंगिक अत्याचार केस 2024 - या केस मध्ये पण महाराष्ट्र सरकारने त्यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली होती.
2016 मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. 2024 मध्ये त्यांनी भाजपकडून मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली पण 16514 मतांनी त्यांचा पराभव झाला. त्यानंतर 2025 मध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना राज्यसभेवर नामनिर्देशित खासदार म्हणून नियुक्त केले. त्यावेळी पंतप्रधान मोदींनी त्यांना मराठीतून फोन करून सांगितले होते की राष्ट्रपती तुम्हाला मोठी जबाबदारी देणार आहेत.
त्यांच्या आयुष्यावर आधारित प्रहार द अनटोल्ड स्टोरी ऑफ उज्ज्वल निकम हा चित्रपट 16 ऑक्टोबर 2026 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात राजकुमार राव यांनी उज्ज्वल निकम यांची भूमिका साकारली आहे. मराठी अभिनेता ललित प्रभाकर याने अजमल कसाबची भूमिका केली आहे. वामिका गब्बी ही त्यांच्या पत्नी ज्योती निकम यांच्या भूमिकेत आहे तर जैदीप अहलावत आणि सिकंदर खेर पण महत्वाच्या भूमिकेत आहेत.
चित्रपटाचे दिग्दर्शन अविनाश अरुण धवारे यांनी केले आहे आणि निर्माता दिनेश विजन मॅडॉक फिल्म्स आहेत. काल 29 सप्टेंबर रोजी या चित्रपटाचा ट्रेलर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, सीएसएमटी येथे लॉन्च करण्यात आला, जिथे 26/11 चा हल्ला झाला होता. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उज्ज्वल निकम आणि राजकुमार राव उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले की हा फक्त मनोरंजनाचा चित्रपट नाही तर न्याय आणि देशभक्तीचा संदेश देणारा चित्रपट आहे.
निकम यांनी स्वतः सांगितले की या चित्रपटात कोणतेही नाटकीकरण केलेले नाही, दोन अडीच वर्षे संशोधन करून कोर्टातील खरे युक्तिवाद आणि घटना दाखवल्या आहेत.