आपण नेहमी कोलेस्ट्रॉल वाढले की घाबरतो. कोलेस्ट्रॉल वाढले म्हणजे हार्ट अटॅक येणार असे आपल्याला वाटते. पण डॉक्टर सांगतात की कोलेस्ट्रॉलपेक्षा सुद्धा जास्त धोकादायक एक घटक आपल्या शरीरात आहे ज्याकडे आपण लक्षच देत नाही. त्या घटकाचे नाव आहे ट्रायग्लिसराईड. हा देखील रक्तात आढळणारा एक प्रकारचा फॅट आहे. याची पातळी वाढली तर हृदयाच्या नसा ब्लॉक होतात आणि हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका अनेक पटीने वाढतो.
ट्रायग्लिसराईड म्हणजे काय
मेयो क्लिनिकच्या माहितीनुसार ट्रायग्लिसराईड हे आपल्या रक्तात असणारे लिपिड म्हणजे चरबी आहे. जेव्हा आपण काही खातो तेव्हा शरीर आपल्या गरजेपेक्षा जास्त असलेल्या कॅलरीचे रूपांतर ट्रायग्लिसराईड मध्ये करते आणि ते आपल्या पेशींमध्ये साठवून ठेवते. जेव्हा शरीराला ऊर्जेची गरज असते तेव्हा हेच ट्रायग्लिसराईड वापरले जाते. पण आपण गरजेपेक्षा जास्त कॅलरी खाल्ली, विशेषतः गोड पदार्थ, मैद्याचे पदार्थ, तेलकट पदार्थ जास्त खाल्ले तर ट्रायग्लिसराईडची पातळी झपाट्याने वाढते. वैद्यकीय भाषेत या आजाराला हायपरट्रायग्लिसराईडेमिया असे म्हणतात.
ट्रायग्लिसराईडची नॉर्मल पातळी किती असावी
प्रत्येक व्यक्तीने आपली ट्रायग्लिसराईड लेव्हल माहिती असणे गरजेचे आहे. रक्त तपासणीतून ही लेव्हल समजते.
नॉर्मल लेव्हल - 150 mg/dL पेक्षा कमी
बॉर्डरलाईन - 150 ते 199 mg/dL
जास्त लेव्हल - 200 ते 499 mg/dL
खूप जास्त म्हणजे धोकादायक लेव्हल - 500 mg/dL पेक्षा जास्त
जर तुमची लेव्हल 200 च्या वर असेल तर तुम्ही लगेच डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि जीवनशैलीत बदल करणे गरजेचे आहे.
ट्रायग्लिसराईड वाढण्याची कारणे काय आहेत
ट्रायग्लिसराईड वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे आपली चुकीची जीवनशैली आहे. जास्त गोड खाणे, मैदा, बिस्कीट, कोल्ड्रिंक, साखर असलेले पदार्थ जास्त खाणे. दिवसभर बसून काम करणे, व्यायाम न करणे. वजन जास्त असणे, लठ्ठपणा असणे. जास्त प्रमाणात दारू पिणे. मधुमेह कंट्रोलमध्ये नसणे. थायरॉईडची समस्या असणे. ही सगळी कारणे ट्रायग्लिसराईड वाढवतात.
ट्रायग्लिसराईड वाढल्याने काय होते
जेव्हा रक्तात ट्रायग्लिसराईड वाढते तेव्हा ते रक्तवाहिन्यांमध्ये जमा होऊ लागते. त्यामुळे रक्तवाहिन्या अरुंद होतात आणि रक्तप्रवाह व्यवस्थित होत नाही. यामुळे हृदयाला जास्त जोर लावावा लागतो आणि हार्ट अटॅकचा धोका वाढतो. याशिवाय ट्रायग्लिसराईड खूप जास्त वाढले तर स्वादुपिंडाला सूज येऊ शकते ज्याला पॅनक्रियाटायटिस म्हणतात, हा खूप गंभीर आजार आहे.
ट्रायग्लिसराईड कमी करण्यासाठी 5 सोपे उपाय
1. दररोज 30 मिनिटे व्यायाम करा
ट्रायग्लिसराईड कमी करण्यासाठी व्यायाम हा सगळ्यात चांगला उपाय आहे. दररोज किमान 30 ते 45 मिनिटे वेगाने चालणे, जिना चढणे, सायकल चालवणे, पोहणे यासारखा व्यायाम करा. नियमित व्यायाम केल्याने ट्रायग्लिसराईड कमी होते आणि गुड कोलेस्ट्रॉल वाढते. ऑफिसमध्ये असाल तर दर एक तासाने उठून थोडे चालावे.
2. गोड आणि मैद्याचे पदार्थ बंद करा
साखर आणि मैद्यापासून बनवलेले पदार्थ ट्रायग्लिसराईड सगळ्यात जास्त वाढवतात. साखर, गूळ, मिठाई, केक, पेस्ट्री, बिस्कीट, पांढरा ब्रेड, समोसा, कोल्ड्रिंक हे पदार्थ खाणे पूर्णपणे टाळा. फळांमध्ये देखील आंबा, चिकू, केळी यासारखी जास्त गोड फळे कमी खा. साखरेऐवजी गोड पदार्थांची इच्छा झाली तर खजूर किंवा थोडे मध घेऊ शकता.
3. वजन कमी करा
वजन आणि ट्रायग्लिसराईडचा थेट संबंध आहे. तुमचे वजन जास्त असेल तर अतिरिक्त कॅलरी फॅटच्या रूपात साठतात आणि ट्रायग्लिसराईड वाढते. त्यामुळे वजन कमी करणे खूप गरजेचे आहे. जेवणात कॅलरी कमी घ्या. तळलेले पदार्थ टाळा. रात्रीचे जेवण हलके ठेवा आणि झोपण्यापूर्वी किमान दोन तास आधी जेवण करा.
4. चांगले फॅट खा
सगळेच फॅट वाईट नसते. चांगले फॅट खाल्ल्याने ट्रायग्लिसराईड कमी होते. स्वयंपाकासाठी ऑलिव्ह ऑईल किंवा मोहरीचे तेल वापरा. लाल मांस म्हणजे मटण खाणे टाळा. त्याऐवजी ओमेगा 3 फॅटी अॅसिड असलेले मासे जसे की सॅल्मन, मॅकेरल, टूना मासे खा. शाकाहारी असाल तर अक्रोड, जवसाच्या बिया, चिया बिया खा. तळलेले तेल पुन्हा पुन्हा वापरू नका.
5. दारू पूर्णपणे बंद करा
दारूमध्ये कॅलरी आणि साखरेचे प्रमाण खूप जास्त असते. थोडी जरी दारू प्यायली तरी ट्रायग्लिसराईड झपाट्याने वाढते. जर तुमची ट्रायग्लिसराईड लेव्हल 500 च्या वर असेल तर दारूला हातही लावू नका. धूम्रपान देखील बंद करा. दारू आणि सिगारेट दोन्ही हृदयासाठी खूप घातक आहेत.
कोणताही आजार झाल्यावर उपचार करण्यापेक्षा तो होऊच नये म्हणून आधीच काळजी घेणे चांगले. त्यामुळे वर्षातून एकदा लिपिड प्रोफाईल टेस्ट करून आपली ट्रायग्लिसराईड लेव्हल तपासा. आहारात हिरव्या भाज्या, फळे, कडधान्ये यांचा समावेश करा आणि शिस्तबद्ध जीवनशैली ठेवा. जर लेव्हल खूप जास्त असेल तर घरगुती उपायांसोबत डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
डिस्क्लेमर - हा लेख सर्वसामान्य माहितीसाठी आहे. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.