पर्यटन विशेष : मेघालयातील चेरापुंजी, जिथे पाऊस कधीच थांबत नाही आणि झाडांच्या मुळांपासून बनले आहेत जिवंत पूल, एकदा तरी पाहायलाच हवे ! - टॉप न्यूज मराठी

पर्यटन विशेष : तुम्ही कधी विचार केला आहे का, सिमेंट किंवा लोखंड न वापरता फक्त झाडाच्या मुळांपासून बनलेला पूल असू शकतो आणि तो 500 वर्षांपासून उभा असू शकतो, शिवाय त्यावर रोज शेकडो लोक चालतात. हे ऐकायला चित्रपटासारखे वाटते पण हे सत्य आहे आणि ते फक्त भारतातील मेघालयातच पाहायला मिळते.

आपण लहानपणापासून पुस्तकात वाचतोय की चेरापुंजी हे जगातील सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण आहे. आता थोडा बदल झाला आहे. चेरापुंजीच्या शेजारचे मौसिनराम हे गाव आता सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण बनले आहे. तरीही चेरापुंजीत वर्षाला 11,777 मिलीमीटर पाऊस पडतो, म्हणजे मुंबईत वर्षभरात जितका पाऊस पडतो त्याच्या पाच पट जास्त. इथे पाऊस छत्रीने थांबत नाही, इथे लोक बांबूपासून बनवलेल्या टोपलीसारख्या टोप्या घालतात ज्याला खासी भाषेत कनूप म्हणतात.

चेरापुंजीचे खरे नाव सोहरा आहे, ब्रिटिशांनी त्याचा अपभ्रंश करून चेरापुंजी केले. समुद्र सपाटीपासून 1484 मीटर उंचीवर असलेले हे गाव.

लिव्हिंग रूट ब्रिज म्हणजे काय आणि तो कसा बनतो

याला खासी भाषेत जिंग कींग जेरी असे म्हणतात. हा पूल माणसाने बनवलेला नाही तर खासी आणि जैंतिया आदिवासींनी वाढवलेला आहे. हे कसे बनवतात हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. रबराच्या झाडाचा एक प्रकार आहे ज्याचे नाव फिकस इलास्टिका आहे, त्याची मुळे खूप लांब आणि लवचिक असतात. आदिवासी लोक त्या मुळांना सुपारीच्या झाडाच्या खोडापासून बनवलेल्या पोकळ नळीतून ओढतात आणि समोरच्या काठावर नेतात. तिथे ती मुळे दुसऱ्या काठाच्या मातीत रुजतात आणि घट्ट होतात. असे करत 15 ते 20 वर्षात एक पूल तयार होतो. जितका जुना होईल तितका तो मजबूत होतो. काही पूल 500 वर्षे जुने आहेत आणि एका वेळी 50 लोकांचे वजन सहन करू शकतात.

सगळ्यात प्रसिद्ध दोन पूल

1. सिंगल डेकर रूट ब्रिज - नोंगरीआत गावात आहे, चेरापुंजीपासून 20 किमी. इथे जायला 3500 पायऱ्या उतराव्या लागतात. 3 तास ट्रेक आहे पण खाली गेल्यावर जे दृश्य दिसते ते स्वर्गासारखे आहे. बाजूला निळ्या पाण्याचा धबधबा आहे.

2. डबल डेकर रूट ब्रिज - हाच जगातील एकमेव दोन मजली जिवंत पूल आहे, याला उम्मशियांग पूल असेही म्हणतात. हाच सर्वात फेमस आहे. दोन पूल एकावर एक आहेत. वरच्या पुलावरून खालच्या पुलाचे दृश्य खूप सुंदर दिसते. हा पूल 200 वर्षांपेक्षा जास्त जुना आहे.

चेरापुंजीमध्ये आणखी काय पाहायचे

  • नोहकलिकाई धबधबा - भारतातील सर्वात उंच धबधबा, 1115 फूट उंचीवरून पाणी पडते. एका मुलीच्या दुःखद प्रेमकथेवरून त्याचे नाव पडले आहे.
  • सेव्हन सिस्टर्स धबधबा - सात धबधबे एकत्र पडतात, पावसाळ्यात तर याचे दृश्य अफलातून असते.
  • मावस्माई गुहा - चुनखडीपासून बनलेली नैसर्गिक गुहा, आतमध्ये लाईट लावले आहेत, खूप मोठी आहे.
  • वेई सॉडोंग धबधबा - हा तीन टप्प्यांत पडणारा धबधबा, इथे तुम्ही पोहू पण शकता.

कसे जायचे, खर्च किती आणि बेस्ट टाईम

कसे जायचे - तुम्हाला आधी गुवाहाटीला यावे लागेल. औरंगाबादहून गुवाहाटीला थेट फ्लाईट आहे, 3 तास लागतात. गुवाहाटी रेल्वे स्टेशनपासून शिलॉंगला बस किंवा शेअर टॅक्सी मिळते, 100 किमी, 3 तास. शिलॉंगपासून चेरापुंजी 54 किमी, दीड तास. शिलॉंगहून दर तासाला सुमो गाड्या मिळतात, भाडे 200 रुपये.

राहण्याची सोय - चेरापुंजीमध्ये होमस्टे खूप आहेत, 1000 ते 1500 रुपयात एका रात्रीसाठी चांगली रूम मिळते. नोंगरीआत गावात पण होमस्टे आहेत, तिथे राहिलात तर सकाळी लवकर पूल पाहता येतो.

बेस्ट टाईम - जर तुम्हाला पाऊस अनुभवायचा असेल तर जून ते सप्टेंबरमध्ये जा. पण ट्रेकिंग करायचे असेल आणि फोटो काढायचे असतील तर ऑक्टोबर ते मे हा बेस्ट टाईम आहे. कारण पावसाळ्यात पायऱ्या खूप निसरड्या होतात.

एकूण खर्च - दोन जणांसाठी 4 दिवसांची ट्रिप 15 ते 20 हजार रुपयात आरामात होते, गुवाहाटी ते गुवाहाटी.

महत्वाच्या टिप्स

1. चेरापुंजीमध्ये नेटवर्क खूप कमी असते, जिओ आणि एअरटेलच थोडेफार चालते.

2. ट्रेकिंग शूज घेऊनच जा, चप्पलवर जाऊ नका.

3. गाईड घेणे गरजेचे आहे, 500 रुपयात लोकल गाईड मिळतो, तो तुम्हाला शॉर्टकट आणि कथा सांगतो.

4. प्लास्टिक नेऊ नका, मेघालय हे भारतातील सर्वात स्वच्छ राज्य आहे.

ज्या लोकांना निसर्ग खरोखरच आवडतो त्यांनी आयुष्यात एकदा तरी हा जिवंत पूल पाहायलाच हवा, कारण हा फक्त पूल नाही तर माणूस आणि निसर्ग एकत्र आले तर काय चमत्कार घडू शकतो याचे जिवंत उदाहरण आहे.

माहिती स्रोत - इंटरनेट