व्यक्तिविशेष : टिनच्या डब्यावर नेम धरणाऱ्या शेतकऱ्याच्या लेकीने इतिहास घडवला, नीरू धांडा जिने आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला मिळवून दिले पहिले वैयक्तिक गोल्ड - टॉप न्यूज मराठी

व्यक्तिविशेष : नीरू धांडा यांचा जन्म 25 मे 2000 रोजी हरियाणातील जींद जिल्ह्यातील संगतपुरा या छोट्याशा गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सुरेश धांडा असून ते दोन एकर जमीन असलेले शेतकरी आहेत आणि आईचे नाव सुदेश धांडा आहे. घरात तीन भावंडे असून नीरू दुसऱ्या क्रमांकावर आहे. घरची परिस्थिती अगदी साधी होती, शेती आणि काही जनावरे यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालायचा. सुरुवातीला नीरूला शूटिंगशी काहीच संबंध नव्हता, ती शाळेत कबड्डी खेळायची आणि राज्यस्तरापर्यंत कबड्डी खेळली आहे.

शिक्षण कुठे झाले

प्राथमिक शिक्षण जींदमधील सरकारी शाळेत झाले. नंतर कुटुंब मध्य प्रदेशातील शिवपुरी येथे स्थलांतरित झाले. तिथेच तिने बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. शूटिंगमुळे तिचे कॉलेजचे शिक्षण खंडित झाले पण तिने मध्य प्रदेश स्टेट शूटिंग अकादमीमध्ये प्रवेश घेतल्यावर तिथेच तांत्रिक शिक्षण आणि क्रीडा प्रशिक्षण घेतले. पुढे भारतीय लष्करात भरती झाल्यामुळे आर्मी मार्कसमनशिप युनिट महू, इंदूर येथे तिने प्रोफेशनल ट्रेनिंग घेतले.

फॅमिली बॅकग्राउंड आणि शूटिंगची सुरुवात

ही गोष्ट 2018 सालची आहे. नीरूचे मामेभाऊ लक्ष्य शेरॉन यांनी जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या ट्रॅप प्रकारात रौप्य पदक जिंकले. टीव्हीवर त्यांचा सत्कार पाहून नीरूने आईला सांगितले की मलाही शूटिंग करायचे आहे. पण एक बंदूक घ्यायला 4 ते 5 लाख रुपये लागतात, हे तिच्या शेतकरी कुटुंबाला परवडणारे नव्हते.

मग तिच्या मामांनी, माजी राष्ट्रीय कुस्तीपटू सोमवीर शेरॉन यांनी तिला मदत केली. नीरू फरीदाबादला त्यांच्या घरी राहून करणी सिंग शूटिंग रेंज दिल्ली येथे लक्ष्यच्या बंदुकीने सराव करू लागली. सुरुवातीला वडिलांनी तिला टिनाच्या डब्यावर नेम धरायला लावला होता. खांद्यावर आणि हनुवटीवर रिकोईलमुळे जखमा झाल्या तरी ती मागे हटली नाही. 2019 मध्ये तिने मध्य प्रदेश स्टेट शूटिंग अकादमीची चाचणी पास केली आणि तिथे तिला मोफत बंदूक आणि काडतुसे मिळू लागली, तिथून तिचा खरा प्रवास सुरू झाला.

क्रीडा क्षेत्रातील आजपर्यंतचे योगदान

  • 2022 - पहिले मोठे यश, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महिलांच्या ट्रॅपमध्ये सुवर्ण पदक. याच वर्षी तिने ISSF वर्ल्ड चॅम्पियनशिप ओसिजेक येथे भारताचे प्रतिनिधित्व केले.
  • 2025 - आशियाई शूटिंग चॅम्पियनशिप शिमकेंट, कझाकिस्तान येथे वैयक्तिक आणि सांघिक दोन्ही प्रकारात सुवर्ण पदक. याच वर्षी तिने दिल्ली येथील शॉटगन ट्रायल्समध्ये पण सुवर्ण जिंकले.
  • 2026 - हे वर्ष नीरूच्या आयुष्यातील ऐतिहासिक वर्ष ठरले. जून 2026 मध्ये इटलीतील लोनाटो येथे झालेल्या ISSF शॉटगन वर्ल्ड कपमध्ये तिने पात्रता फेरीत 121/125 गुण मिळवून राष्ट्रीय विक्रम केला आणि फायनलमध्ये 30 पैकी 27 टार्गेट भेदून सुवर्ण पदक जिंकले. ट्रॅपमध्ये वर्ल्ड कप गोल्ड जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली. याच वर्ल्ड कप सर्किटमध्ये अल्माटी येथे तिने मिश्र सांघिक प्रकारात कांस्य पदकही जिंकले.
  • 29 सप्टेंबर 2026 - आशियाई क्रीडा स्पर्धा 2026, आईची-नागोया, जपान. या दिवशी नीरूने भारताचा 48 वर्षांचा दुष्काळ संपवला. महिलांच्या ट्रॅप फायनलमध्ये तिने 30 पैकी 28 टार्गेट अचूक भेदले आणि आशियाई विक्रमासह सुवर्ण पदक जिंकले. चीनच्या सुन युंगोंगला रौप्य आणि कुवेतच्या हजर अब्दुलमलिकला कांस्य मिळाले. पात्रता फेरीत ती कतारच्या रे बासिलसोबत संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावर होती. या स्पर्धेत तिने सांघिक रौप्य पदक पण मिळवून दिले. भारतीय महिलांनी ट्रॅपमध्ये आजपर्यंत आशियाई क्रीडा स्पर्धेत पदकच जिंकले नव्हते, नीरूने थेट सुवर्णावर नाव कोरले. हे भारताचे या आशियाई स्पर्धेतील पहिले वैयक्तिक सुवर्ण ठरले.
  • सध्या ती भारतीय लष्करात नायब सुभेदार या पदावर आहे आणि कॉर्प्स ऑफ मिलिटरी पोलीसमध्ये कार्यरत आहे. तिचे प्रशिक्षक ऑलिम्पिक चॅम्पियन पीटर विल्सन आहेत.

नीरू धांडाची गोष्ट फक्त एका पदकाची नाही तर एका शेतकऱ्याच्या मुलीने कर्ज काढून बंदूक न घेता उधारीच्या बंदुकीवर सराव करून जग जिंकण्याची गोष्ट आहे. तिच्या आईने काल एका मुलाखतीत सांगितले, " छोरी ने बता दिया सपनो को कैसे पुरा करना है...!" 

माहिती स्रोत - इंटरनेट