मनाचे आरोग्य : कोणाशी बोलावेसे वाटत नाही, कामाची इच्छा होत नाही? कदाचित तुम्ही दुसऱ्यावर नाही तर स्वतःवरच नाराज आहात, औषधे नाही 'हे' करा - टॉप न्यूज मराठी

मनाचे आरोग्य : अनेकदा आपल्याला वाटते की थकवा आला आहे, झोप पूर्ण झाली नाही किंवा शरीरात एखादे व्हिटॅमिन कमी झाले म्हणून असे वाटत आहे. औषध घेतले की बरे वाटेल असे आपल्याला वाटते. पण प्रत्येक वेळी कारण शारीरिक नसते. अनेकदा कारण मानसिक असते आणि ते आपल्या लक्षातही येत नाही.

आपण दुसऱ्यावर नाराज असतो असे आपल्याला वाटते, पण खरे तर आपण स्वतःवरच नाराज असतो. गेल्या काही दिवसांपासून आपली रोजची छोटी छोटी कामे पूर्ण होत नाहीत. सकाळी लवकर उठायचे होते पण उठलो नाही, व्यायाम करायचा होता पण आळस केला, महत्त्वाचा फोन करायचा होता पण पुढे ढकलला. हे छोटे छोटे पेंडिंग राहिलेले निर्णय मनावर साचत जातात. आपण स्वतःलाच टाळत असतो आणि त्यातून एक प्रकारची अपराधीपणाची भावना तयार होते. तीच भावना पुढे जाऊन उदासीनता किंवा कशातच रस न वाटणे या रूपात बाहेर येते.

आपल्या नेहमीच्या रुटीनमध्ये जेव्हा आळसामुळे बदल होतो तेव्हा मेंदूला त्याचा थकवा जास्त जाणवतो. आपण काहीच काम केलेले नसते तरी दिवसभर थकल्यासारखे वाटते. कारण मनात सतत एक यादी सुरू असते, हे राहिले, ते राहिले. या यादीमुळे आपण दमून जातो.

यावर उपाय काय करावा ?

यावर उपाय खूप मोठा नाही. स्वतःला थोडा वेळ द्या. जेव्हा असे काहीच करावेसे वाटत नसेल तेव्हा स्वतःला दोष देऊ नका. एक तासाचा ब्रेक घ्या. शक्य असेल तर कोणताही फोन न पाहता फक्त पडा. तासभर झोप घ्या किंवा डोळे बंद करून शांत बसा. शरीरात साचलेला आळस थोडा कमी होऊ द्या.

पण खरी गोष्ट यानंतर सुरू होते. जेव्हा तुम्ही झोपेतून किंवा ब्रेकवरून उठाल तेव्हा लगेच मोबाईल घेऊ नका. एक कागद घ्या. गेल्या दोन तीन दिवसांपासून जी कामे पेंडिंग आहेत ती लिहा. अगदी छोटी कामे सुद्धा, जसे कपडे घडी घालणे, बिल भरणे, कोणाला मेसेज करणे.

आता त्यातली सगळ्यात छोटी आणि लगेच होणारी दोन कामे आधी पूर्ण करा. एक काम पूर्ण झाले की मेंदूला एक छोटा विजय मिळतो. त्यातून डोपामिन तयार होते आणि मनाला वाटते की मी काहीतरी केले. हाच छोटा विजय तुमचा दिवस बदलून टाकतो. मनावरचा सगळा थकवा हळूहळू कमी होऊ लागतो.

लक्षात ठेवा, प्रत्येक वेळी नैराश्य म्हणजे मोठा आजार नसतो. कधी कधी ते फक्त स्वतःला वेळेवर न सांभाळल्यामुळे आलेला कंटाळा असतो. स्वतःच्या छोट्या जबाबदाऱ्या वेळेवर पूर्ण केल्या की मन आपोआप हलके होते.

डिस्क्लेमर - हा लेख सामान्य माहिती आणि जीवनशैलीवर आधारित आहे. जर तुम्हाला सतत उदास वाटत असेल, झोपेवर परिणाम होत असेल, भूक कमी झाली असेल किंवा रोजच्या कामात अडथळा येत असेल तर हा लेख वैद्यकीय सल्ला नाही. अशा वेळी जवळच्या डॉक्टरांचा किंवा मानसिक आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्वाचे आहे. गरज वाटल्यास तुम्ही टेलिमानस हेल्पलाईन 14416 वर संपर्क करू शकता.