पुण्यात प्रसिद्धीच्या नावाखाली खंडणीचा धक्कादायक प्रकार ! माजी वैद्यकीय अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला; बिग बॉस फेम अभिनेत्रीवर गुन्हा दाखल - टॉप न्यूज मराठी

पुणे : पुण्याच्या महंमदवाडी हडपसर परिसरात पाच लाख रुपयांच्या खंडणीसाठी एका सेवानिवृत्त डॉक्टरला त्यांच्याच घरात घुसून मारहाण केल्याचा आणि त्यांची कार घेऊन पळून गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी बिग बॉस मराठी फेम दिव्या शिंदे आणि आण्णा डमरे यांच्यासह 8 ते 10 जणांविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 24 सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजता ही घटना घडली असून जखमी डॉक्टरवर ससून हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

नेमके काय घडले ?

फिर्यादी डॉ. विठ्ठाधर गायकवाड वय 65 हे पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी पदावरून 2022 मध्ये सेवानिवृत्त झाले आहेत. ते करणदायी फाउंडेशनचे सदस्य आहेत. या फाउंडेशनने 1 ते 3 सप्टेंबर दरम्यान बालगंधर्व रंगमंदिरात कला आविष्कार महोत्सव आयोजित केला होता. 

तक्रारीनुसार या कार्यक्रमाची प्रसिद्धी करण्यासाठी दिव्या शिंदे हिला संस्थेकडून कोणतेही अधिकृत आमंत्रण किंवा करार देण्यात आला नव्हता. तरीही ऑगस्ट महिन्यापासून प्रसिद्धी केल्याचे सांगत पाच लाखांची मागणी सुरू होती. 17 सप्टेंबर रोजी आरोपी गायकवाड यांच्या घरी जाऊन पत्नी आणि मुलाला दमदाटी करून गेले, 23 सप्टेंबर रोजी हॉटेलमध्ये बोलावून पुन्हा धमकी दिली आणि 24 सप्टेंबर रोजी रात्री घरी एकटे असताना 8 ते 10 जणांसह घरात घुसून लाथाबुक्क्यांनी, लाकडी दांडके, कंबरेचा पट्टा, लोखंडी भांडे आणि धारदार हत्याराने डोक्यावर वार करून गंभीर मारहाण केली. यावेळी पत्नीला बघून घेऊ आणि कार घेऊन जाऊ अशी धमकी देऊन कार घेऊन पसार झाले. याबाबत डॉ. गायकवाड यांनी म्हटले आहे की, कार्यक्रम संस्थेने आयोजित केला होता, मी केवळ संस्थेचा सदस्य आहे, मला पक्षाघात झाला असून माझी प्रकृतीही ठीक नाही, कार्यक्रमाची प्रसिद्धी करण्यासाठी दिव्या शिंदे हिला कोणीही सांगितले नव्हते किंवा कोणतेही अधिकृत आमंत्रण दिले नव्हते, तरीही माझ्याकडे पाच लाख रुपयांची मागणी करण्यात आली.

दिव्या शिंदे कोण आहे ?

दिव्या शिंदे ही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असून सोशल मीडियावर सरकार आणि जुन्नरची वाघीण या नावाने प्रसिद्ध आहे. पुण्यातील सिंहगड लॉ कॉलेजची विद्यार्थिनी असून विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी आणि आंबेडकरी चळवळीतील आंदोलनांमुळे चर्चेत आली होती. सिंहगड लॉ कॉलेजमध्ये डोनेशन घेऊन प्रवेश दिला जात असल्याचा आरोप करत तिने केलेले आंदोलनाचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. त्यानंतर तिला बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये संधी मिळाली, तिथे जयभीम च्या घोषणेसह एन्ट्री करत ती चर्चेत आली होती. मात्र शो दरम्यान सहस्पर्धकांना तलवारीने मारण्याची धमकी दिल्याने तिला घराबाहेर काढण्यात आले होते. इन्स्टाग्रामवर तिचे 9 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत आणि ती सरकार सेना या संघटनेची अध्यक्ष असल्याचे सांगितले जाते. (माहिती स्रोत : इंटरनेट)

या तक्रारीनंतर हडपसर पोलिसांनी दिव्या शिंदे रा. सनसिटी लाईफ रोड सिंहगड रोड, आण्णा डमरे रा. पिंपरी चिंचवड आणि त्यांच्या 8 ते 10 साथीदारांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 309(4), 333, 109(1), 118(1), 115(2), 352, 351(3), 189(2), 191(3), 190 आणि 324(4) अंतर्गत खंडणी, घरात बेकायदेशीर प्रवेश, जीवघेणा हल्ला, तोडफोड आणि धमकी या गुन्ह्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी घटनेचा पुढील तपास सुरू केला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे. 

दरम्यान या संपूर्ण घटनेवर आणि दाखल झालेल्या गुन्ह्यावर दिव्या शिंदे यांची कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.