व्यक्तिविशेष : महाराष्ट्रात जन्म झालेले पण गुजरातला कर्मभूमी मानणारे आणि आज देशाच्या राजकारणाचे केंद्रबिंदू ठरलेले नाव म्हणजे अमित शहा. त्यांना भाजपचे चाणक्य म्हटले जाते. एका साध्या कार्यकर्त्यापासून ते देशाचे गृहमंत्री आणि सहकार मंत्री होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास हा अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.
अमित शहा यांचे पूर्ण नाव अमित अनिलचंद्र शहा आहे. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबई येथे झाला. त्यांचे मूळ गाव गुजरातमधील माणसा आहे. त्यांचे कुटुंब हे गुजराती बनिया समाजातील एक श्रीमंत व्यापारी कुटुंब आहे. त्यांचे वडील अनिलचंद्र शहा यांचा पीव्हीसी पाईप बनवण्याचा मोठा व्यवसाय होता. त्यांच्या आईचे नाव कुसुमबेन शहा आहे. अमित शहा यांचे बालपण माणसा गावातच गेले.
त्यांचे शालेय शिक्षण माणसा जिल्हा शाळेत झाले. वयाच्या 16 व्या वर्षी ते अहमदाबादला गेले. तिथे त्यांनी सी. यू. शहा सायन्स कॉलेजमधून बायोकेमिस्ट्री मध्ये बीएससी पदवी घेतली. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी काही काळ वडिलांच्या व्यवसायात आणि स्टॉक ब्रोकर म्हणून काम केले. तसेच अहमदाबाद जिल्हा सहकारी बँकेतही त्यांनी काम केले आहे.
अमित शहा यांचे लग्न 1987 साली सोनल शहा यांच्याशी झाले. सोनल शहा या सामाजिक कार्यात सक्रिय असतात. त्यांना एक मुलगा आहे, त्याचे नाव जय शहा आहे. जय शहा हे सध्या बीसीसीआयचे सचिव म्हणून ओळखले जातात. अमित शहा यांना बुद्धिबळ खेळण्याची आणि क्रिकेट ऐकण्याची खूप आवड आहे.
अमित शहा यांच्या राजकारणाची सुरुवात खूप लहान वयात झाली. वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक बनले. वयाच्या 16 व्या वर्षी ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत सामील झाले आणि 1982 मध्ये ते गुजरात एबीव्हीपीचे संयुक्त सचिव बनले.
1987 मध्ये त्यांनी भारतीय जनता युवा मोर्चामध्ये प्रवेश केला. तिथेच त्यांची भेट नरेंद्र मोदी यांच्याशी झाली. 1989 मध्ये ते अहमदाबाद भाजपचे सचिव बनले. त्यांनी राम जन्मभूमी आंदोलन आणि एकता यात्रेत सक्रिय भाग घेतला. 1991 मध्ये त्यांनी लालकृष्ण अडवाणी यांच्या गांधीनगर लोकसभा प्रचाराची धुरा सांभाळली आणि त्यांना जिंकवून आणले.
1997 मध्ये त्यांनी पहिल्यांदा सरखेज विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणूक जिंकली. त्यानंतर 1998, 2002 आणि 2007 अशा सलग चार वेळा ते आमदार म्हणून निवडून आले. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना अमित शहा यांच्याकडे गृह, कायदा आणि संसदीय कामकाज यासारखी महत्त्वाची खाती होती.
2014 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर अमित शहा यांना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष बनवण्यात आले. अध्यक्ष म्हणून त्यांनी भाजपला देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवले. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात 80 पैकी 73 जागा जिंकून देण्यात त्यांचा मोठा वाटा होता. त्यांच्या काळात भाजप हा जगातील सर्वात मोठा पक्ष बनला.
2019 मध्ये ते गांधीनगरमधून पहिल्यांदा खासदार झाले आणि त्यांना देशाचे गृहमंत्री बनवण्यात आले. गृहमंत्री म्हणून त्यांनी कलम 370 हटवणे, नागरिकत्व सुधारणा कायदा आणि जम्मू काश्मीरचे दोन केंद्रशासित प्रदेशात विभाजन यासारखे ऐतिहासिक निर्णय घेतले. 2021 पासून ते देशाचे पहिले सहकार मंत्री म्हणूनही काम पाहत आहेत. आज ते देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात शक्तिशाली नेते मानले जातात.