शैक्षणिक : दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने पेपर पॅटर्नमध्ये मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. हा बदल 2026-27 या शैक्षणिक वर्षापासून लागू होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा ताण कमी होणार आहे.
आतापर्यंत दहावी बारावीच्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिका 10 ते 11 पानांच्या असायच्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना पेपर हाताळताना गोंधळ व्हायचा. आता हीच प्रश्नपत्रिका फक्त 3 ते 4 पानांची होणार आहे. बोर्ड दोन्ही बाजूंनी प्रिंटिंग करणार आहे. यामुळे पेपरची लांबी 60 टक्क्यांनी कमी होणार आहे.
बोर्डाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी याबाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले की सध्या प्रश्नपत्रिकांसाठी बोर्डाला दरवर्षी सुमारे 30 कोटी रुपये खर्च येतो. नवीन पॅटर्नमुळे सुमारे 18 कोटी रुपयांची बचत होणार आहे. तसेच पर्यावरणासाठी देखील हा निर्णय चांगला आहे. कागदाची बचत होणार आहे.
नवीन पॅटर्नमध्ये फॉन्ट साईज आणि प्रश्नांची संख्या तीच राहणार आहे. फक्त पेपरची मांडणी बदलणार आहे. नवीन पेपरमध्ये गुणांचे विभाजन अधिक स्पष्ट दिसेल. प्रश्नांचा क्रम चांगला लावला जाईल. एका प्रश्नाचे सर्व उपप्रश्न एकाच पानावर असतील. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रश्न शोधण्यासाठी वेळ वाया जाणार नाही.
याशिवाय बोर्डाने आणखी एक बदल केला आहे. बारावीच्या पेपरमध्ये 25 टक्के प्रश्न हे बहुपर्यायी म्हणजे MCQ स्वरूपाचे असतील. उर्वरित प्रश्न हे लहान आणि मोठ्या उत्तराचे असतील. प्रत्येक विषयात 80 गुणांची थिअरी आणि 20 गुणांचे इंटरनल असे एकूण 100 गुण राहतील. पास होण्यासाठी 35 टक्के गुण लागतील.
बोर्डाने पेपर फुटी रोखण्यासाठी डिजिटल ट्रंक पद्धत देखील सुरू केली आहे. बारामती तालुक्यात याचा प्रयोग यशस्वी झाला आहे. आता संपूर्ण राज्यात ही पद्धत वापरली जाणार आहे. याशिवाय आता मार्कशीट आणि सर्टिफिकेट एकाच कागदावर मिळणार आहे. त्यावर विद्यार्थ्याचा फोटो आणि बारकोड असणार आहे.
त्यामुळे दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांनी नवीन पॅटर्ननुसार अभ्यास सुरू करावा.