अहिल्यानगर : अहिल्यानगरमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागले आहे. अहिल्यानगरमधील भिंगार कॅम्प परिसरामध्ये गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान एक तरुण पाय घसरून पडला मिळालेल्या माहितीनुसार त्यानंतर गंभीर दुखापत झालेल्या अवस्थेत त्याला अहिल्यानगरमधील साईदीप रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
या घटनेनंतर शहरांमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. ऐन गणपती उत्सवाच्या सणामध्ये भिंगार शहर परिसरामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. सध्या सोशल मीडियावर या घटनेबाबत वेगवेगळे मतप्रवाह पाहायला मिळत आहेत. सोशल मीडियावर हा तरुण पोलिसांनी केलेल्या लाठी चार्जमध्ये घसरून पडला त्यानंतर त्याच्या डोक्याला दुखापत झाली असे सांगण्यात येत असले तरीही अहिल्यानगर पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन केले आहे. ते म्हणाले कि , " सोशल मीडियावरील व्हिडिओ पाहून अफवा पसरवू नये. खरं आहे ते समोर येईल. प्रोसेस सुरू झाली आहे. दोषींवर कारवाई केली जाईल... ! " असे आश्वासन पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी दिले आहे.
दरम्यान घटना घडल्यानंतर परिसरातील वातावरण अत्यंत तणावपूर्ण आहे. आमदार संग्राम जगताप यांनी परिसराची पाहणी केली. घडलेल्या घटनेबाबत सविस्तर माहिती घेतल्यानंतर याबाबत त्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
या घटनेमध्ये दीपक वागस्कर या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू ओढावला आहे. परंतु या घटनेबाबत कोणतीही अफवा पसरवू नये असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. एकंदरीतच वैद्यकीय अहवालानंतरच तरुणाचा मृत्यू नेमका कशाने झाला हे स्पष्ट होऊ शकेल.