"अख्ख्या देशात विष पसरवून ते कुठे गेले ? ज्ञानेश कुमारचं प्रकरण आल्यावर...!" संजय राऊत यांचा अमित शाहांवर गंभीर आरोप, नेमकं काय म्हणाले ? - टॉप न्यूज मराठी

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना कर्नाटक दौऱ्यादरम्यान फूड पॉयझनिंग झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्यांचे हुबळी आणि बेळगावी येथील नियोजित कार्यक्रम रद्द करावे लागले. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी याबाबत माहिती देताना शाह यांची प्रकृती आता ठिक असल्याचे सांगितले आहे.

शाह हे १९ सप्टेंबर रोजी कर्नाटक दौऱ्यावर होते. हुबळीतील गब्बूर येथे केएलई जगदगुरू गंगाधर महास्वामीगलू मूरुसाविरमठ मेडिकल कॉलेजच्या नवीन अकादमीक इमारत आणि १२०० बेडच्या हॉस्पिटल आणि मेडिकल रिसर्च सेंटरचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार होते. तसेच बेळगावी जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील एक्सांबा येथील श्री बीरेश्वर को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या नवीन इमारतीचे उद्घाटनही होणार होते. मात्र अचानक उलट्या सुरू झाल्याने त्यांना अशक्तपणा आला आणि डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला. त्यामुळे ते हॉटेलमध्येच थांबले आणि नंतर दिल्लीला रवाना झाले. त्यांच्या अनुपस्थितीत हे कार्यक्रम प्रल्हाद जोशी आणि इतर नेत्यांच्या हस्ते पार पडले.

या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अमित शाह यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले, "अख्ख्या देशात विष पसरवून ते कुठे गेले? त्यांना फूड पॉयझनिंग झाले, असे काय खाल्ले त्यांनी? मी त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी स्वतःला कोंडून घेतले आहे."

राऊत यांचा रोख मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या प्रकरणाकडे होता. ज्ञानेश कुमार यांचे प्रकरण समोर आल्यानंतर अमित शाह यांनी स्वतःला कोंडून घेतल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे.

नेमकं काय आहे आयुक्त ज्ञानेश कुमार यांचे प्रकरण ?

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर सध्या गंभीर आरोप होत आहेत. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या एका तपास अहवालानुसार निवडणूक आयोगातील दोन निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांनी गेल्या १० महिन्यांत तब्बल १४ वेळा ज्ञानेश कुमार यांच्या कामकाजावर आक्षेप घेतला आहे. 

निवडणूक आयोगात कोणताही निर्णय तिन्ही आयुक्तांच्या संमतीने घ्यावा लागतो. मात्र ज्ञानेश कुमार यांनी दोन्ही आयुक्तांना विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेतले आणि आदेश काढले असा आरोप आहे. विशेषतः मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षण म्हणजेच SIR प्रक्रियेतील फॉर्म 6 आणि इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी मनमानी केल्याचे सांगितले जात आहे.

या अहवालानंतर विरोधक आक्रमक झाले आहेत. संजय राऊत यांनी ज्ञानेश कुमार यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. तसेच "देशातील निवडणूक ही थट्टा बनली आहे, निवडणूक आयोग गृहमंत्रालयाच्या इशाऱ्यावर चालतो" असा आरोप त्यांनी केला आहे. ज्ञानेश कुमार हे तुरुंगात जातील आणि त्यांचे मालक देश सोडून पळून जातील असे ट्वीटही राऊत यांनी केले आहे.

याप्रकरणी विरोधी पक्षांनी संसदेत ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याची तयारी सुरू केली आहे. ६० हून अधिक खासदारांनी याबाबत नोटीस दिल्याची माहिती आहे. डीएमके, काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसनेही या प्रकरणाची संसदीय चौकशी आणि SIR प्रक्रिया रद्द करण्याची मागणी केली आहे.