पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात गर्दी वाढली असून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन चिंचवड वाहतूक विभागाचे पोलीस उपनिरीक्षक रवींद्र आहेरराव यांनी केले.
जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने अखिल मंडई मित्र मंडळ चिंचवड येथे आयोजित लोकसंवाद कार्यक्रमात ते नागरिकांशी बोलत होते. गंभीर आजाराने मरण पावणाऱ्यांपेक्षा रस्ते अपघातात मरण पावणाऱ्यांची संख्या अधिक आहे ही चिंताजनक बाब आहे असे त्यांनी सांगितले.
पालकांनी आपल्या अल्पवयीन मुलांना वाहन चालवण्याची परवानगी देऊ नये. गणेशोत्सव काळात मंडपांमुळे रस्ते अरुंद होतात त्यामुळे वाहन चालवताना अधिक काळजी घ्यावी. वाहतुकीच्या नियमांचे पालन करून पोलीस यंत्रणेवरील ताण कमी करावा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी गणेश मंडळाचे अध्यक्ष अतुल पडवळ उपस्थित होते.
रस्ते वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित ठेवण्यासाठी मोटार वाहन कायद्याचे पालन करणे गरजेचे आहे. विना परवाना वाहन चालवल्यास पाच हजार रुपये दंड आहे. सिग्नल तोडल्यास पाचशे रुपये दंड आणि वारंवार चूक केल्यास पंधराशे रुपयांपर्यंत दंड व तीन महिन्यांसाठी परवाना निलंबित केला जातो. हेल्मेट न घातल्यास एक हजार रुपये दंड होतो.
दुचाकीवर दोघांनीही हेल्मेट घालावे, चारचाकीत सीट बेल्ट लावावा, दारू पिऊन गाडी चालवू नये, वेगावर नियंत्रण ठेवावे आणि मोबाईलवर बोलत गाडी चालवू नये असेही उपनिरीक्षक रवींद्र आहेरराव यांनी सांगितले.