अर्थकारण : तुम्हीही क्रेडिट कार्ड वापरता का ? क्रेडिट कार्ड वापरण्याचे फायदे आणि तोटे लक्षात घ्या - टॉप न्यूज मराठी

अर्थकारण : आजकाल प्रत्येकाच्या खिशात क्रेडिट कार्ड दिसते. ऑनलाईन शॉपिंग असो किंवा हॉटेल बिल भरणे असो, क्रेडिट कार्डमुळे पैशांची अडचण लगेच दूर होते. पण हे कार्ड योग्य पद्धतीने वापरले नाही तर कर्जाच्या जाळ्यात देखील अडकवू शकते. त्यामुळे त्याचे फायदे आणि तोटे जाणून घेणे गरजेचे आहे.

क्रेडिट कार्ड वापरण्याचे फायदे

1. तात्काळ पैसे मिळतात - हातात पैसे नसताना देखील क्रेडिट कार्डवर खरेदी करता येते. पगार येण्यापूर्वी अचानक खर्च आला तर याचा खूप फायदा होतो.

2. रिवॉर्ड पॉइंट आणि कॅशबॅक - प्रत्येक खरेदीवर बँक रिवॉर्ड पॉइंट, कॅशबॅक आणि डिस्काउंट देते. विमान तिकीट, सिनेमा तिकीट आणि ऑनलाईन शॉपिंगवर यामुळे हजारो रुपयांची बचत होते.

3. क्रेडिट स्कोअर सुधारतो - वेळेवर क्रेडिट कार्डचे बिल भरले तर तुमचा सिबिल स्कोअर वाढतो. पुढे होम लोन किंवा कार लोन घेताना याचा खूप फायदा होतो, लोन लवकर मंजूर होते.

4. व्याजमुक्त कालावधी - क्रेडिट कार्डवर 45 ते 50 दिवसांचा व्याजमुक्त कालावधी मिळतो. या काळात पैसे भरले तर एक रुपयाही व्याज लागत नाही.

5. इमर्जन्सीमध्ये उपयोगी - हॉस्पिटल किंवा अचानक मोठा खर्च आला तर क्रेडिट कार्ड वरदान ठरते. त्याचे मोठ्या हप्त्यांमध्ये म्हणजेच EMI मध्ये रुपांतर देखील करता येते.

क्रेडिट कार्ड वापरण्याचे तोटे

1. जास्त व्याजदर - जर तुम्ही फक्त मिनिमम अमाऊंट भरली आणि पूर्ण बिल नाही भरले तर 35 ते 42 टक्के वार्षिक व्याज लागते. हे सर्वात मोठे नुकसान आहे.

2. कर्जाच्या सवयी लागते - हातात पैसे नसताना खरेदी करण्याची सवय लागते. अनेक लोक गरज नसताना देखील खरेदी करतात आणि नंतर बिल भरणे कठीण होते.

3. लेट फी आणि इतर चार्जेस - बिल भरण्यास उशीर झाला तर लेट फी, जीएसटी आणि व्याज असे तिहेरी नुकसान होते. तसेच एटीएम मधून पैसे काढल्यास लगेच व्याज सुरू होते.

4. क्रेडिट स्कोअर खराब होऊ शकतो - सतत बिल थकवले किंवा लिमिटच्या 80 टक्के पेक्षा जास्त वापर केला तर सिबिल स्कोअर झपाट्याने कमी होतो.

5. फसवणुकीचा धोका - ऑनलाईन फ्रॉड, ओटीपी शेअर झाल्यास किंवा कार्ड हरवल्यास पैशांचे मोठे नुकसान होऊ शकते.

क्रेडिट कार्ड वापरताना काय काळजी घ्यावी

नेहमी एकूण लिमिटच्या 30 ते 40 टक्के पेक्षा जास्त वापर करू नका. दर महिन्याला पूर्ण बिल भरा, फक्त मिनिमम अमाऊंट भरू नका. एटीएम मधून क्रेडिट कार्डवर पैसे काढू नका. आणि दोनपेक्षा जास्त क्रेडिट कार्ड घेऊ नका. जर तुम्ही शिस्त पाळून क्रेडिट कार्ड वापरले तर ते खूप फायदेशीर आहे, पण निष्काळजीपणा केला तर ते आर्थिक अडचणीत टाकू शकते.

डिस्क्लेमर - हा लेख सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. क्रेडिट कार्डचे नियम आणि व्याजदर बँकेनुसार बदलू शकतात. कार्ड घेण्यापूर्वी संबंधित बँकेच्या अटी आणि शर्ती नक्की वाचाव्यात.