पेट्रोल डिझेलच्या दराबाबत सध्या सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने 16 सप्टेंबर 2026 पासून पेट्रोल डिझेलवरील एक्सपोर्ट लेव्ही म्हणजेच निर्यात कर कमी केला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या मनात प्रश्न आहे की आता पेट्रोल स्वस्त होणार का ?
केंद्र सरकार दर 15 दिवसांनी पेट्रोलियम पदार्थांवरील निर्यात कराचा आढावा घेते. 16 सप्टेंबर रोजी झालेल्या आढाव्यानुसार सरकारने मोठी कपात केली आहे.
पेट्रोलवरील निर्यात कर 1.50 रुपयांवरून 0.50 रुपये प्रति लिटर करण्यात आला आहे.
डिझेलवरील निर्यात कर 25 रुपयांवरून 20 रुपये प्रति लिटर करण्यात आला आहे.
एटीएफ म्हणजेच विमानाच्या इंधनावरील कर 19 रुपयांवरून 15 रुपये प्रति लिटर करण्यात आला आहे.
हा निर्णय 16 सप्टेंबरपासून पुढील 15 दिवसांसाठी लागू राहणार आहे. पुढील आढावा झाल्यावर पुन्हा दर बदलू शकतात.
या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे. सरकारने जो कर कमी केला आहे तो फक्त निर्यात होणाऱ्या इंधनावर आहे. देशात विकल्या जाणाऱ्या पेट्रोल डिझेलवरील एक्साईज ड्युटी मध्ये कोणताही बदल केलेला नाही.
त्यामुळे थेट पंपावर पेट्रोल स्वस्त होणार नाही. 17 सप्टेंबर आणि 21 सप्टेंबर रोजी सुद्धा देशातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल डिझेलचे दर स्थिर होते. दिल्लीत पेट्रोल 102.12 रुपये, मुंबईत 111.21 रुपये, पुण्यात साधारण 110 ते 111 रुपये प्रति लिटर या दराने विकले जात आहे.
या निर्णयाचा फायदा मोठ्या रिफायनरी कंपन्यांना होणार आहे, जसे की रिलायन्स, नायरा एनर्जी. त्यांना परदेशात इंधन पाठवताना कमी कर भरावा लागेल, त्यामुळे त्यांचा नफा वाढेल. सरकारने हा कर मार्च 2026 मध्ये पश्चिम आशियातील युद्धामुळे लावला होता, जेणेकरून कंपन्या जास्त नफ्यासाठी सर्व इंधन परदेशात पाठवू नयेत आणि देशात तुटवडा होऊ नये.
सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूडचा भाव 107.8 डॉलर प्रति बॅरलच्या आसपास आहे. पायपलाईन विस्कळीत झाल्यामुळे भाव वाढले आहेत. सरकारी तेल कंपन्यांनी सांगितले आहे की देशांतर्गत दर हे आंतरराष्ट्रीय क्रूड, डॉलरचा भाव आणि टॅक्स यावर ठरतात. सध्या तरी सरकारने देशांतर्गत एक्साईज 10 रुपयांनी कमी केल्याने दर स्थिर ठेवले आहेत.