आसामच्या घनदाट जंगलात आणि नदीच्या काठावर असे काही दगड सापडतात जे पाहून वैज्ञानिक सुद्धा हैराण झाले आहेत. हे दगड पाण्यात टाकले की लाकडासारखे तरंगतात, पण हातात घेतले की चांगलेच वजनदार वाटतात. स्थानिक लोक याला जादुई दगड म्हणतात.
हे दगड आसामच्या दिब्रुगड आणि तिनसुकिया भागातील जंगलात आणि ब्रह्मपुत्रा नदीच्या काठावर सापडल्याचे सांगितले जाते. स्थानिक आदिवासी लोक सांगतात की पावसाळ्यात नदीचे पाणी वाढले की हे दगड वाहत येतात. काही दगडांचा रंग काळा असतो, काही पांढरट राखाडी असतात आणि त्यांना आतमध्ये बारीक बारीक छिद्रे असतात.
या दगडांचे खरे नाव प्युमिस स्टोन आहे. हा एक ज्वालामुखीचा दगड आहे. जेव्हा ज्वालामुखीचा उद्रेक होतो तेव्हा गरम लाव्हा खूप वेगात थंड होतो. थंड होताना त्याच्या आतमध्ये हवा आणि गॅसचे हजारो बुडबुडे अडकून राहतात. त्यामुळे दगडाला आतून स्पंज सारखी जाळी तयार होते.
या हवेच्या बुडबुड्यांमुळे या दगडाची घनता पाण्यापेक्षा कमी होते. पाण्याची घनता 1 ग्रॅम प्रति सेंटीमीटर असते तर प्युमिसची घनता फक्त 0.25 ग्रॅम असते. त्यामुळे तो सहज पाण्यावर तरंगतो. हातात घेतला की तो दगडच वाटतो म्हणून वजनदार वाटतो पण पाण्यात टाकताच आतल्या हवेमुळे तो बुडत नाही.
अमेरिकेतील बर्कले लॅबच्या वैज्ञानिकांनी या दगडांवर एक्स रे स्कॅन केले. त्यांना दिसले की या दगडाच्या आत केसाएवढ्या बारीक नळ्या असतात. पाणी त्या नळ्यांमध्ये सहज शिरू शकत नाही कारण सरफेस टेन्शन म्हणजे पाण्याच्या पृष्ठभागावरील एक पातळ पडदा त्याला अडवतो. त्यामुळे गॅस आतच अडकून राहतो आणि दगड वर्षानुवर्षे तरंगत राहतो. हळूहळू जेव्हा हवा बाहेर जाते तेव्हा तोच दगड नंतर पाण्यात बुडतो सुद्धा.
भारतामध्ये या दगडांचा संबंध रामसेतूशी पण जोडला जातो. रामेश्वरममध्ये जे दगड तरंगतात ते सुद्धा याच प्रकारचे प्युमिस किंवा कोरलचे दगड आहेत असे सांगितले जाते. पण आसाममध्ये सापडणारे दगड हे ब्रह्मपुत्रा खोऱ्यात जुन्या काळात झालेल्या ज्वालामुखीमुळे आले असावेत असे भूगर्भ शास्त्रज्ञ सांगतात.
आज या दगडांचा वापर बांधकामात हलके कॉंक्रीट बनवण्यासाठी, बागकामात माती भुसभुशीत ठेवण्यासाठी आणि ब्युटी पार्लरमध्ये टाचांची मृत त्वचा काढण्यासाठी केला जातो.