व्यक्तिविशेष : महाराष्ट्राला अनाथांची माई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांचे जीवन म्हणजे संघर्ष, जिद्द आणि मातृत्वाचे जिवंत उदाहरण आहे. ज्या मुलीला जन्मताच नकोशी म्हणून चिंधी असे नाव ठेवले, त्याच मुलीने पुढे 1050 पेक्षा जास्त अनाथ मुलांना आईचे प्रेम दिले.
सिंधुताई सपकाळ यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1948 रोजी वर्धा जिल्ह्यातील पिंपरी मेघे या गावात झाला. त्यांचे मूळ नाव सिंधू अभिमन्यू साठे. त्यांचे वडील अभिमन्यू साठे हे गुरे राखण्याचे काम करायचे. घरात प्रचंड गरिबी होती. मुलगी नको असताना झाली म्हणून घरच्यांनी तिचे नाव चिंधी ठेवले होते. सिंधुताई हुशार होत्या, त्यांना शिकायची खूप इच्छा होती. पण आईचा विरोध आणि गरिबीमुळे त्यांना फक्त चौथी पर्यंतच शिकता आले. चौथी पास झाल्यानंतर त्यांना शाळा सोडावी लागली.
वयाच्या 12 व्या वर्षी त्यांचे लग्न त्यांच्यापेक्षा 20 वर्षांनी मोठे असलेल्या श्रीहरी सपकाळ यांच्याशी लावून देण्यात आले. श्रीहरी हे शेतकरी होते. लग्नानंतर त्या नवरगाव येथे राहायला गेल्या. त्यांना तीन मुले झाली. पण पतीकडून सतत मारहाण आणि छळ सहन करावा लागत होता.
सिंधुताई नऊ महिन्यांच्या गरोदर असताना पतीने त्यांना बेदम मारहाण करून घराबाहेर काढले. त्याच अर्धबेशुद्ध अवस्थेत त्यांनी गोठ्यात गाईच्या शेणाच्या ढिगाऱ्यावर एका मुलीला जन्म दिला. त्याच मुलीचे नाव ममता. माहेरी गेल्यावर आई वडिलांनीही आधार दिला नाही. पोट भरण्यासाठी त्यांना भीक मागावी लागली, रेल्वे स्टेशनवर गाणी म्हणून भीक मागून त्यांनी दिवस काढले. याच काळात त्यांना रस्त्यावर बेवारस पडलेली अनेक अनाथ मुले दिसली. आपल्यासारखीच नकोशी असलेली मुले पाहून त्यांनी ठरवले की आपणच यांची आई व्हायचे.
एकदा वर्ध्याच्या जंगलात आदिवासींवर अन्याय होत होता. तिथल्या जमीनदाराविरुद्ध सिंधुताईंनी आवाज उठवला. तेव्हा तत्कालीन वनमंत्री छेडीलाल गुप्ता यांनी त्यांची दखल घेतली आणि त्यांना समाजसेवेची पहिली संधी मिळाली.
दुसरी घटना म्हणजे अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात त्यांनी स्मशानातील भाकरी खाऊन राहण्याचा निर्णय घेतला. तिथेच त्यांना पहिली अनाथ मुले मिळाली. भीक मागून आणलेले अन्न त्या आधी त्या मुलांना भरवत असत. त्यांनी ठरवले की भीक मागणे हा गुन्हा नाही, पण त्याच भीकेवर दुसऱ्याचे पोट भरणे हे पुण्य आहे.
अनाथ मुलांना दिशा देण्यासाठी त्यांनी 1994 साली पुण्याजवळ पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण येथे ममता बाल सदन या संस्थेची स्थापना केली. यानंतर त्यांनी अनेक आश्रम उभे केले.
मुख्य आश्रम
ममता बाल सदन, कुंभारवळण, पुणे
सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह, वर्धा
अभिमान बाल भवन, वर्धा
गोपिका गाईचे गोपालन आणि वृद्धाश्रम
मांझरी, पुणे येथील सुसज्ज अनाथाश्रम
या आश्रमांमध्ये मुलांना जेवण, कपडे, शिक्षण तर मिळतेच पण शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरीसाठी मार्गदर्शन आणि लग्न लावून देण्याचे कामही संस्था करते. त्यांच्या आश्रमात राहिलेल्या मुलांची संख्या 1050 पेक्षा जास्त आहे, त्यांचे 207 जावई आणि 36 सुना आहेत असे त्या अभिमानाने सांगत.
त्यांच्या जीवनावर 2010 साली अनंत महादेवन यांनी मी सिंधुताई सपकाळ हा मराठी बायोपिक बनवला. या चित्रपटाची निवड 54 व्या लंडन फिल्म फेस्टिवलमध्ये वर्ल्ड प्रीमियरसाठी झाली होती आणि या चित्रपटाला 4 राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. या चित्रपटात तेजस्विनी पंडित यांनी सिंधुताईंची भूमिका साकारली होती.
सिंधुताई सपकाळ यांना हर्नियाचे ऑपरेशन झाल्यानंतर काही दिवसांनी पुण्यातील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. 4 जानेवारी 2022 रोजी रात्री 8 वाजून 10 मिनिटांनी हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या 73 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. सिंधुताई गेल्या पण त्यांनी लावलेली मायेची झाडे आजही हजारो अनाथ मुलांना सावली देत आहेत.