रात्रीस खेळ चाले फेम अभिनेत्री अपूर्वा नेमलेकर सध्या तिच्या अमेरिकेतील टूरमुळे चर्चेत आहे. पहिलं लग्न मोडल्यानंतर अपूर्वाने मॅट्रिमोनियल साईटवर ओळख झालेल्या तनुज गोवळकर सोबत दुसरं लग्न केलं. लग्नानंतर दोघे अमेरिकेला गेले होते. तिथेच अपूर्वाची पहिली मंगळागौर साजरी झाली. पारंपरिक साडी, नथ, आणि मंगळागौरीचा साज असलेले तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. पण याच फोटोंवर एका महिलेने अशी घाणेरडी कमेंट केली की सगळ्यांनाच धक्का बसला.
त्या महिलेने अपूर्वाच्या पोस्टवर कमेंट करत लिहिले होते, किती जाड आणि वयस्कर दिसते ही अपूर्वा म्हातारी, मेकअपमुळे बरी दिसते नाहीतर चेहरा लूज पडलेला आहे. नशीब हिचं लहान वयाच्या मुलासोबत लग्न झालं, पंचवीस वर्षांपूर्वी लग्न झालं असतं तर हिचा मुलगा आता नवरा केला त्याच्या वयाचा असता. नवरोबाची आई वाटते ही.
ही कमेंट वाचून कोणालाही राग येईल. पण अपूर्वाने घाबरून कमेंट डिलीट केली नाही. तिने उलट त्या कमेंटचा स्क्रीनशॉटच सगळ्यांसमोर आणला.
स्क्रीनशॉट शेअर करत अपूर्वा म्हणाली, बोर्डच्या मागे लपून विष ओकायला कष्ट लागत नाहीत. स्वतःच्या आयुष्यात किती रिकामेपण आणि नैराश्य असेल की, एका अनोळखी माणसाच्या दिसण्यावर आणि लग्नावर इतकं घाणेरडं भाष्य करावं लागतं. सोशल मीडियावर नकारात्मकता आणि वास्तव दाखवण्यासाठी मी हे इथे शेअर करतीये. मला यानं काही फरक पडत नाही पण ही विकृती समोर येणं गरजेचं होतं.
अपूर्वाच्या या पोस्टनंतर अनेक कलाकार आणि चाहत्यांनी तिला पाठिंबा दिला आहे. लोक म्हणत आहेत की एका स्त्रीनेच दुसऱ्या स्त्रीच्या वयावरून आणि वजनावरून असे बोलणे ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे.
अपूर्वा आधीच बिग बॉस मराठी, आभास हा आणि रात्रीस खेळ चाले 2 मधील शेवंता या भूमिकेमुळे घराघरात पोहोचली आहे. पण प्रसिद्धी मिळाली की ट्रोलिंग येणारच, असं सध्या चित्र झालंय. खास करून अभिनेत्रींच्या दिसण्यावरून, वयावरून, लग्नावरून कमेंट करणे हे तर नित्याचेच झाले आहे.
प्रश्न असा आहे की सोशल मीडियावर दुसऱ्याच्या आनंदात विष कालवून या लोकांना काय मिळते. अपूर्वाने या निमित्ताने ही विकृती समोर आणली आहे.