धक्कादायक : महाभारत फेम अभिनेता सौरव गुर्जरला मुंबई विमानतळावरून अटक, लग्नाचे आमिष दाखवून महिलेचे शोषण केल्याचा आरोप - टॉप न्यूज मराठी

मुंबई : महाभारत मालिकेत भीमाची भूमिका साकारणारा आणि ब्रह्मास्त्र सिनेमात झळकलेला अभिनेता सौरव गुर्जर मोठ्या वादात अडकला आहे. एका 29 वर्षीय महिलेने लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याचा आरोप त्याच्यावर केला आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी सौरव गुर्जरला मुंबई विमानतळावरून ताब्यात घेतले आहे. न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

 कोण आहे सौरव गुर्जर 

अभिनेता आणि माजी डब्ल्यूडब्ल्यूई कुस्तीपटू आहे. त्याला खरी ओळख मिळाली ती स्टार प्लसच्या महाभारत या गाजलेल्या मालिकेमुळे, ज्यात त्याने भीमाची भूमिका साकारली होती. भीमाच्या भूमिकेसाठी त्याची शरीरयष्टी आणि अभिनय खूप गाजला होता. यानंतर त्याने अनेक पौराणिक मालिकांमध्ये काम केले आहे. शिव शक्ती - त्याग तांडव, वीर आंजनेय, संकटमोचन महाबली हनुमान सारख्या मालिकांमध्ये तो दिसला आहे. तसेच रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या ब्रह्मास्त्र पार्ट वन शिवा या मोठ्या बजेट सिनेमातही त्याने महत्त्वाची भूमिका केली होती.

नेमके काय घडले 

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि सौरव यांची ओळख 2021 मध्ये इंस्टाग्रामवर झाली होती. सोशल मीडियावरून ओळख झाल्यानंतर दोघांनी एकमेकांचे नंबर घेतले आणि व्हॉट्सअॅपवर बोलणे सुरू झाले. बोलता बोलता मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, 25 डिसेंबर 2021 रोजी ती पहिल्यांदा सौरवला प्रत्यक्ष भेटली. पहिल्याच भेटीत सौरवने तिला लग्नाचे वचन देऊन विश्वास संपादन केल्याचा आरोप महिलेने केला आहे. त्यानंतर लग्नाचे खोटे आमिष दाखवून तिचे लैंगिक शोषण केल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी गचीबोवली पोलिसात तक्रार दाखल झाली आहे.

या संपूर्ण प्रकरणावर सौरव गुर्जर याच्याकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. तो सध्या न्यायालयीन कोठडीत असल्याने त्याच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. त्याच्या वकिलाकडून किंवा कुटुंबाकडूनही यावर कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.