तुम्ही कधी विचार केला आहे का, गुगल मॅप उघडले की रस्ता कधी हिरवा, कधी पिवळा तर कधी लाल दिसतो. लाल म्हणजे ट्रॅफिक जॅम आहे. पण गुगलला हे कसे कळते की त्या रस्त्यावर गर्दी आहे. तिथे कॅमेरा लावला आहे का, कोणी सांगते का. तर नाही, यामागे खूप स्मार्ट तंत्रज्ञान आहे.
जगभरात कोट्यवधी लोकांच्या मोबाईल मध्ये गुगल मॅप चालू असतो. प्रत्येक फोन आपले लोकेशन दर काही सेकंदाला गुगलला पाठवत असतो. यालाच अनॉनिमस लोकेशन डेटा म्हणतात. म्हणजे गुगलला कळत नाही की हा तुम्हीच आहात, पण कळते की या रस्त्यावर इतके फोन आहेत.
समजा एका रस्त्यावर 50 फोन आहेत आणि ते सगळे ताशी 5 किलोमीटर वेगाने जात आहेत. तर गुगलला समजते की तिथे गाड्या हळू चालल्या आहेत, म्हणजे ट्रॅफिक जॅम आहे. तेव्हा तो रस्ता लाल दाखवतो. जर तेच फोन ताशी 60 किलोमीटर वेगाने जात असतील तर रस्ता हिरवा दाखवतो. म्हणजे गर्दी नाही.
गुगलकडे गेल्या अनेक वर्षांचा डेटा आहे. उदाहरणार्थ, पुण्यातील स्वारगेट ते हडपसर रस्त्यावर दररोज सकाळी 9 वाजता गर्दी होते, हे गुगलला माहित आहे. त्यामुळे भविष्यात सुद्धा त्या वेळेत तो आधीच पिवळा किंवा लाल दाखवायला सुरुवात करतो. याला ट्रॅफिक प्रेडिक्शन म्हणतात.
आता गुगल फक्त फोनच्या वेगावर अवलंबून नाही. तो आजूबाजूच्या गोष्टी पण पाहतो. जसे त्या रस्त्यावर काही अपघात झाला आहे का, पाऊस पडतोय का, रोडचे काम चालू आहे का, सण आहे का. हे सगळे न्यूज, सरकारी डिपार्टमेंट आणि युजर्सच्या रिपोर्टवरून गुगलला कळते. एआय या सगळ्याचा अभ्यास करून ठरवतो की इथे ट्रॅफिक लागणार आहे.
थोडक्यात सांगायचे तर गुगल मॅपवर दिसणारा लाल रस्ता हा कोणत्याही कॅमेऱ्याने नाही तर तुमच्या सारख्या लाखो लोकांच्या फोनच्या वेगावरून ठरतो. जितके जास्त लोक गुगल मॅप वापरतील तितका ट्रॅफिक डेटा जास्त अचूक होतो.