पर्यटन : साताऱ्याच्या कुशीत वसलेले तापोळा हे गाव गेल्या काही वर्षात पर्यटकांच्या मनात घर करून बसले आहे. महाबळेश्वर तालुक्यातील हे छोटेसे गाव आहे, पण त्याचे सौंदर्य मोठे आहे. याला महाराष्ट्राचे मिनी काश्मीर असेही म्हणतात.
तापोळा पुण्यापासून सुमारे 145 ते 150 किलोमीटर अंतरावर आहे. पिरंगुटवरून निघालात तर साधारण 3.5 ते 4.5 तास लागतात. रूट आहे पुणे - वाई - पाचगणी - महाबळेश्वर - तापोळा. महाबळेश्वरपासून तापोळा फक्त 25 ते 28 किलोमीटर आहे. मुंबईपासून अंतर 280 ते 300 किलोमीटर आहे.
भौगोलिक दृष्ट्या तापोळा खूप महत्त्वाचे आहे. इथे कोयना धरणामुळे तयार झालेला शिवसागर जलाशय आहे. हा जलाशय 90 किलोमीटर लांब पसरला आहे आणि त्याच्या दोन्ही बाजूला सह्याद्रीचे घनदाट जंगल आहे. कोयना, सोळशी आणि कांदोटी या तीन नद्यांचा त्रिवेणी संगम इथेच होतो. त्यामुळे इथे कायम पाणी असते आणि परिसर वर्षभर हिरवागार राहतो. हे गाव कोयना वन्यजीव अभयारण्याच्या अगदी जवळ आहे.
एकाच ठिकाणी तुम्हाला सगळे मिळते म्हणून तापोळा पाहायला जावे. पहिले कारण म्हणजे शिवसागर तलावातील बोटिंग. इथे मोटर बोट, शिकारा आणि कायाकिंग करता येते. सकाळच्या धुक्यात बोटिंगचा अनुभव काश्मीरच्या दल लेक सारखा वाटतो. दुसरे कारण म्हणजे शांतता. महाबळेश्वरमध्ये गर्दी असते, पण तापोळा अजूनही शांत आहे. तिसरे कारण म्हणजे फोटोग्राफी. तलाव, जंगल आणि डोंगर एकाच फोटोमध्ये येतात. पावसाळ्यानंतर सप्टेंबर ते फेब्रुवारी हा काळ इथे जाण्यासाठी सर्वोत्तम आहे.
बाय रोड जाणे सर्वात सोपे आहे. पुण्यातून स्वारगेट किंवा शिवाजीनगर येथून महाबळेश्वरसाठी एसटी बस आहे, तिथून तापोळ्यासाठी जीप किंवा लोकल बस मिळते. स्वतःची कार असेल तर उत्तम. पुणे - तापोळा कॅबचे भाडे साधारण 4000 ते 4500 रुपये वन वे आहे. बाईकने जाणाऱ्यांसाठी रस्ता चांगला आहे, पण महाबळेश्वरनंतर घाटाचा रस्ता अरुंद आहे.
रेल्वेने जायचे असेल तर जवळचे रेल्वे स्टेशन सातारा आहे, सुमारे 55 किलोमीटर आणि वाई 70 किलोमीटर. पण पुणे रेल्वे स्टेशन मुख्य हब आहे, तिथून पुढे रस्त्याने जावे लागते. विमानाने जायचे असेल तर पुणे विमानतळ 150 किलोमीटर अंतरावर आहे.
तापोळ्यात मोठे फाईव्ह स्टार हॉटेल नाहीत, पण हेच त्याचे वैशिष्ट्य आहे. इथे लेक व्ह्यू रिसॉर्ट, इको लॉज, होम स्टे आणि टेंट कॅम्पिंग असे पर्याय आहेत. अनेक ठिकाणी 1200 ते 2500 रुपये प्रति व्यक्ती मध्ये राहणे, जेवण आणि कायाकिंग असे पॅकेज मिळते. शोरलाईन रिसॉर्ट, तापोळा रिव्हर कॅम्प ही नावे प्रसिद्ध आहेत. जेवणात तुम्हाला अस्सल महाराष्ट्रीयन थाळी, कोकणी पद्धतीचे मासे, पिठलं भाकरी आणि शेतातील ताज्या भाज्या मिळतात. स्ट्रॉबेरीच्या सीझनमध्ये महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी आणि जेरबेरा फुलांचे नर्सरी पण पाहता येतात.
1. बामणोली बोट क्लब - तापोळ्यापासून जवळ, इथूनच वासोटा किल्ल्यासाठी बोट मिळते.
2. वासोटा किल्ला ट्रेक - कोयना अभयारण्यात असलेला हा ट्रेक जंगलातून जातो, वन विभागाची परवानगी लागते, गाईड सोबत जावे लागते.
3. कास पठार - तापोळ्यापासून 70 किलोमीटर, सप्टेंबरमध्ये फुलांचे पठार फुलते.
4. त्रिवेणी संगम - तीन नद्या एकत्र येतात, संध्याकाळी फोटो छान येतात.
5. कोयना वन्यजीव अभयारण्य - वाघ, अस्वल आणि अनेक पक्षी पाहता येतात.
6. महाबळेश्वर - वेन्ना लेक, आर्थर सीट पॉईंट, मॅप्रो गार्डन तापोळ्यापासून एका तासावर आहेत.
दोन दिवसांचा प्लान केला तर पहिल्या दिवशी बोटिंग आणि कॅम्प फायर, दुसऱ्या दिवशी वासोटा किंवा महाबळेश्वर करता येईल. तापोळा हे ठिकाण अशा लोकांसाठी आहे ज्यांना गर्दी नको आहे, फक्त निसर्ग हवा आहे. कुटुंब, मित्र किंवा कपल कोणीही गेले तरी निराश होणार नाही.