भाद्रपद महिन्यातील शुद्ध पक्षातील अनुराधा नक्षत्रावर गौरी आवाहन, ज्येष्ठा नक्षत्रावर गौरी पूजन आणि मूळ नक्षत्रावर गौरी विसर्जन केले जाते. गणपती बाप्पा पाठोपाठ त्यांची आई गौरी घरी येते अशी मान्यता आहे.
या वर्षी गौरी आवाहन उद्या आहे. सकाळी घर स्वच्छ करून उंबरठ्यावर हळद कुंकवाने स्वस्तिक आणि लक्ष्मीची पावले काढावीत. दाराला आंब्याच्या पानाचे तोरण बांधावे. गौरीला बसण्यासाठी पाटावर रांगोळी काढावी.
1. आणण्याची पद्धत - गौरीचे मुखवटे किंवा खडे आणताना ताटात घेऊन, वाजत गाजत आणावेत. काही ठिकाणी नदीकाठचे पाच खडे आणून त्यांची पूजा केली जाते. एका सुपात पाच खडे, त्यावर हळद कुंकू वाहून गौरीचे प्रतीक म्हणून आणले जातात.
2. स्थापना - घरी आणल्यावर पाटावर लाल वस्त्र अंथरावे. त्यावर तांदूळ ठेवून त्यावर गौरीचे मुखवटे ठेवावेत. काही ठिकाणी दोन गौरी ज्येष्ठा आणि कनिष्ठा अशा दोन रूपात मांडतात.
3. अलंकार - गौरीला नवीन साडी नेसवावी. बांगड्या, मंगळसूत्र, नथ, फणी, आरसा, कुंकवाचा करंडा ओटीत ठेवावा. ओटीमध्ये तांदूळ, सुपारी, खारीक, बदाम, हळकुंड ठेवावे.
पहिल्या दिवशी आवाहन - गौरीची प्राणप्रतिष्ठा करावी. हळद कुंकू वाहून फुले वाहावीत. गणपतीला आवाहन करावे - हे गौरी पुत्रा, तुझ्या मातेला घेऊन ये.
दुसऱ्या दिवशी मुख्य पूजा - 16 प्रकारची पत्री, 16 प्रकारची फुले वाहावीत. नैवेद्यामध्ये पुरणपोळी, 16 भाज्यांची भाजी, भात, वरण, पापड, लोणचे, लाडू, मोदक असावा. संध्याकाळी हळदी कुंकू करावे. सुवासिनींना बोलावून ओटी भरावी.
या दिवशी गौरीपुढे खेळणी मांडली जातात. भातुकलीचा संसार मांडण्याची प्रथा आहे. यामागे समृद्धी आणि बालसुखाची प्रार्थना असते.
तिसऱ्या दिवशी विसर्जन - सकाळी दही भाताचा नैवेद्य दाखवावा. गौरीला निरोप देताना - गौराई गौराई कुठे चालली, माहेराला चालली, माहेरवाशिणीला हळदी कुंकवाने निरोप द्यावा. तिच्या ओटीत पुढच्या वर्षी लवकर ये असे सांगून धान्य आणि नाणी टाकावीत. नंतर मुखवटे किंवा खडे विसर्जित करावेत.
गौरीला पार्वतीचे रूप मानले जाते. ती माहेरवाशिणीच्या रूपात येते. तिच्या आगमनाने घरात सुख समृद्धी येते, पतीला दीर्घायुष्य मिळते आणि मुलाबाळांची भरभराट होते अशी श्रद्धा आहे. महाराष्ट्रात कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रात गौरी पूजन मोठ्या उत्साहात केले जाते.