पुण्यात रविवारी देवगाणीची मैफल - केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते डॉ. सलील कुलकर्णी यांना यशवंत देव पुरस्कार - टॉप न्यूज मराठी

पुणे : संगीतकार यशवंत देव यांच्या जन्मशताब्दीनिमित्त प्रभाकर फाउंडेशनतर्फे संगीतकार यशवंत देव पुरस्कार वितरण सोहळा आणि त्यांच्या अजरामर गीतांवर आधारित देवगाणी या विशेष संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम रविवार, दि. 20 सप्टेंबर 2026 रोजी दुपारी 12 वाजता कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात होणार आहे.

यावर्षीचा प्रतिष्ठेचा संगीतकार यशवंत देव पुरस्कार प्रसिद्ध संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी यांना जाहीर झाला आहे. केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. उच्च व तंत्रशिक्षण तथा संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत.

या कार्यक्रमाचे निमंत्रक नगरसेविका ज्योत्स्ना जगन्नाथ कुलकर्णी आहेत. संवाद पुणेचे सुनील महाजन यांनी या कार्यक्रमाची निर्मिती केली आहे. निकिता मोघे सूत्रधार असून संयोजन केतकी महाजन बोरकर करीत आहेत.

देवगाणी या कार्यक्रमात गायक जितेंद्र अभ्यंकर आणि रश्मी मोघे यशवंत देव यांची गाणी सादर करणार आहेत. त्यांना केदार परांजपे, राजेंद्र दुरकर, राजेंद्र साळुंखे, समीर बंकापुरे आणि नरेंद्र चिपळूणकर हे साथसंगत करणार आहेत. कार्यक्रमाचे निवेदन स्नेहल दामले करणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला ठेवण्यात आला आहे.