मंत्रिमंडळ निर्णय : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नाशिक शाखेला अभ्यासिका व वाचनालयासाठी मिळालेल्या इमारतीच्या भाडेपट्टयासाठी द्यावे लागणारे मुद्रांक शुल्क माफ करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाखा नाशिक यांना नाशिक महानगरपालिकेच्या देवळाली येथील देवीचौकातील प्रशासकीय इमारतीतील चार मजल्यांपैकी दुसरा व तिसरा मजला अभ्यासिका व वाचनालयासाठी भाडेपट्ट्याने देण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे. साहित्य परिषद वाचनालय व अभ्यासिक हे उपक्रम लोकहितास्तव राबवित असल्याचे नमूद करून या इमारतीच्या भाडेपट्ट्याच्या दस्त नोंदणीसाठी द्यावे लागणारे मुद्रांक शुल्क माफ करण्याची विनंती महाराष्ट्र साहित्य परिषदेने केली होती. त्याबाबतचा प्रस्ताव आज मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्यात आला. त्यानुसार भाडेपट्ट्यावरील मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आली.