गणपती बाप्पाच्या जन्माची कथा : हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात श्री गणेशाच्या पूजनाने होते. त्याला प्रथम पूज्य म्हटले जाते. पण बुद्धीची देवता असलेल्या या गजाननाचा जन्म कसा झाला, त्याला हत्तीचे मुख कसे प्राप्त झाले यामागे एक अतिशय सुंदर आणि रहस्यमय कथा शिवपुराणात सांगितली आहे.
ही गोष्ट आहे कैलास पर्वताची. एकदा माता पार्वती स्नानासाठी जात असताना आपल्या रक्षणासाठी कोणीतरी हवे होते. त्या वेळी कैलासावर भगवान शंकर नव्हते आणि नंदी बाहेर द्वारपाल म्हणून उभा होता, पण तो प्रत्येकाला आत येऊ देत होता. म्हणून माता पार्वतीने आपल्या अंगावरील उटण्यापासून, आपल्या शरीराच्या मळापासून एका सुंदर बालकाची मूर्ती तयार केली. आपल्या दिव्य शक्तीने तिने त्या मूर्तीमध्ये प्राण ओतले. तो बालक इतका तेजस्वी आणि सुंदर होता की साक्षात तेजाचा गोळाच होता.
माता पार्वतीने त्या बालकाला सांगितले, तू माझा पुत्र आहेस. मी स्नानाला जात आहे, तोपर्यंत तू द्वारावर उभा रहा आणि कोणीही आत येऊ देऊ नकोस. मातेची आज्ञा शिरसावंद्य मानून तो बालक हातात काठी घेऊन द्वारावर पहारा देऊ लागला.
त्याच वेळी भगवान शंकर कैलासावर परत आले. ते आपल्या भवनात जाण्यासाठी आत जाऊ लागले, तेव्हा त्या बालकाने त्यांना अडवले. तो म्हणाला, माझ्या मातेची आज्ञा आहे, कोणीही आत जाऊ शकत नाही. भगवान शंकरांना आश्चर्य वाटले. त्यांनी सांगितले मी या भवनाचा स्वामी आहे, मला आत जाऊ दे. पण तो बालक आपल्या मातेच्या आज्ञेवर ठाम राहिला. त्याने महादेवांनाही आत जाऊ दिले नाही.
भगवान शंकरांना राग आला. त्यांनी आपल्या गणांना त्या बालकाला हटवण्यास सांगितले. पण त्या छोट्याशा बालकाने आपल्या शक्तीने सर्व शिवगणांना पराभूत केले. नंदी, भृंगी कोणीही त्याच्यापुढे टिकू शकले नाही. शेवटी स्वतः भगवान शंकरांना त्या बालकाशी युद्ध करावे लागले आणि रागाच्या भरात भगवान शंकरांनी आपल्या त्रिशूलाने त्या बालकाचे मस्तक धडावेगळे केले.
हा आवाज ऐकून माता पार्वती बाहेर आली. आपल्या पुत्राला मृत अवस्थेत पाहून ती अतिशय दुःखी झाली आणि तिचा राग अनावर झाला. तिच्या क्रोधाने संपूर्ण सृष्टी हादरू लागली. तिने आपल्या शक्तीने सर्व देवतांना स्तब्ध केले. तेव्हा सर्व देवतांनी भगवान शंकरांना प्रार्थना केली की देवीला शांत करा.
भगवान शंकरांना आपली चूक कळाली. त्यांनी माता पार्वतीला शांत केले आणि सांगितले मी आपल्या पुत्राला पुन्हा जिवंत करेन. त्यांनी आपल्या गणांना आदेश दिला की उत्तर दिशेला जा आणि जो कोणी प्राणी पहिल्यांदा दिसेल त्याचे मस्तक घेऊन या. गण उत्तर दिशेला गेले, तेव्हा त्यांना पहिला हत्ती दिसला. ते त्या हत्तीचे मस्तक घेऊन आले.
भगवान शंकरांनी ते गजमुख त्या बालकाच्या धडावर ठेवले आणि आपल्या दिव्य शक्तीने त्याला पुन्हा जिवंत केले. माता पार्वतीचा पुत्र पुन्हा जिवंत झाला, पण आता तो गजमुख झाला होता.
त्यानंतर भगवान शंकरांनी त्या बालकाला आशीर्वाद दिला. ते म्हणाले आजपासून तू गजानन, गणपती म्हणून ओळखला जाशील. माझ्या सर्व गणांचा तू अधिपती असशील. कोणत्याही देवतेच्या पूजेपूर्वी तुझीच पूजा केली जाईल. तुझ्या पूजनाशिवाय कोणतेही कार्य सिद्ध होणार नाही. तेव्हापासून गणपती बाप्पा प्रथम पूज्य झाले.
या कथेतून आपल्याला शिकायला मिळते की मातृभक्ती आणि कर्तव्यनिष्ठा किती श्रेष्ठ असते. आपल्या आईच्या शब्दासाठी प्राण देणारा आणि देवाधिदेव महादेवांनाही अडवणारा तोच खरा गणपती बाप्पा आहे.