आपण सगळे आयुष्यभर कोण आपला खरा साथीदार आहे याच्याच शोधात असतो. कोणी म्हणतं आई आहे, कोणी म्हणतं बाबा आहेत, नवरा बायको आहेत, मुलं आहेत, तर कोणी म्हणतं मित्र आहेत. पण खरं सांगू का, यातले कोणीच तुमचे शेवटपर्यंतचे जीवनसाथी नाहीत.
तुमचा खरा जीवनसाथी आहे तुमचे शरीर. हो, हेच ते शरीर ज्याला आपण रोज गृहीत धरतो. एकदा का या शरीराने साथ सोडली, की मग कोणीही तुमच्यासोबत राहत नाही. सगळी नाती, सगळा पैसा, सगळी प्रॉपर्टी इथेच राहते. जन्मापासून ते शेवटच्या श्वासापर्यंत फक्त आणि फक्त तुमचे शरीर तुमच्यासोबत असते.
मग विचार करा, आपण या खऱ्या साथीदारासाठी काय करतो. दिवसभर धावपळ, बाहेरचे तेलकट खाणे, रात्री उशिरापर्यंत जागणे, टेन्शन घेणे, व्यसन करणे. आपणच आपल्या शरीराला रोज थोडं थोडं मारत असतो. आणि मग शरीर आजारी पडलं की आपण देवाला दोष देतो.
एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही शरीराची काळजी घ्याल तरच शरीर तुमची काळजी घेईल. हा सरळ हिशोब आहे. तुम्ही काय खाता, किती झोपता, किती चालता, टेन्शन कसं हँडल करता, यावरच तुमचे शरीर कसं वागणार हे ठरतं.
पैसा आज आहे उद्या नाही. नातेवाईक आणि मित्र सुद्धा एका वेळेपर्यंतच सोबत असतात. पण शरीर हा तुमचा एकमेव कायमचा पत्ता आहे. जिथे तुम्ही आयुष्यभर राहणार आहात. ही तुमची अशी प्रॉपर्टी आहे जी दुसरा कोणीही शेअर करू शकत नाही. त्यामुळे याची जबाबदारी फक्त तुमचीच आहे.
मग करायचं काय तर फार काही अवघड नाही.
फुफ्फुसांसाठी रोज थोडा प्राणायाम करा, फक्त 10 मिनिटं.
मन शांत ठेवण्यासाठी ध्यान करा.
शरीर लवचिक राहण्यासाठी योगा करा.
हृदयासाठी रोज अर्धा तास चालून या.
पोटासाठी, आतड्यांसाठी चांगलं घरचं अन्न खा.
मनासाठी चांगले विचार वाचा, चांगल्या लोकांमध्ये राहा.
आणि जगण्यासाठी सगळ्यात महत्वाचं, चांगले कर्म करत राहा.
बाकी सगळं मोह आहे, शेवटी साथ देणारं फक्त तुमचं शरीरच आहे. त्याला जपा, म्हणजे ते तुम्हाला जपेल.