जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा ‘श्री गणेश सुवर्णधाम’ मंदिरात विराजमान - टॉप न्यूज मराठी

हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी सार्वजनिक गणपती ट्रस्ट’चे बाप्पा मोठ्या जल्लोषात आणि भक्तीमय वातावरणात ‘श्री गणेश सुवर्णधाम मंदिरा’त विराजमान झाले. जगप्रसिद्ध बासरीवादक पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या हस्ते दुपारी साडेबाराच्या सुमारास मंत्रोच्चारात बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. तत्पूर्वी, ढोल-ताशा पथकांच्या गजरात मोठ्या थाटामाटात मिरवणूक काढण्यात आली होती, मिरवणुकी दरम्यान इंद्रधनुष्यातील सप्तरंगाची उधळण आणि बुधवार चौकात सात थर रचून करण्यात आलेले बाप्पाचे जंगी स्वागत हे विशेष आकर्षण ठरले. या आगमन मिरवणुकीत हजारो भाविक सहभागी झाले होते.

        दरवर्षीच्या प्रथा परंपरेप्रमाणे सकाळी ट्रस्टचे उत्सव प्रमुख व विश्वस्त पुनीत बालन व जान्हवी धारीवाल-बालन या दांपत्याच्या हस्ते रंगारी भवनात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाची विधीवत पूजा व आरती झाली. त्यानंतर आढाव बंधूचे नगारा वादन झाले. त्यानंतर आकर्षक फुलांनी आणि केळीच्या पानांच्या खुंटांनी सजविलेल्या पारंपरिक रथात बाप्पाच्या मिरवणुकीला सुरुवात झाली. यावेळी भवन परिसरातील वातावरण भक्तीमय झाले होते. 

       रंगारी भवनापासून मुख्य मिरवणुकीला सुरुवात झाली. श्री छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याने पुढे बुधवार चौक, अप्पा बळवंत चौक आणि बाजीराव रस्त्यावरून ही भव्य मिरवणूक दिमाखात निघाली. मिरवणुकीत श्रीराम पथक, नादब्रह्म, ज्ञानप्रबोधिनी, आवर्तन, वाद्यवृंद, समर्थ, शिवाय शंखनाद यांसारख्या प्रसिद्ध ढोल-ताशा पथकांनी आपल्या अप्रतिम वादनाचा नजराणा पेश केला.  मिरवणूक बुधवार चौकात पोहोचताच तिथे कसबा, पुणे दहीहंडी संघाच्या गोविंदांनी मानवी मनोरे (थर) रचून बाप्पाला अत्यंत शिस्तबद्ध आणि भक्तिमय वातावरणात मानवंदना दिली. यानंतर सर्व कार्यकर्त्यांनी व भक्तांनी हवेत सप्तरंगांची उधळण केली. ढोलांच्या तालावर नाचणारे तरुण-तरुणी, हवेतील विविधरंगी गुलाल आणि 'गणपती बाप्पा मोरया'च्या घोषाने संपूर्ण बुधवार चौक दुमदुमून गेला होता.

     दुपारी साडेबाराच्या सुमारास आगमन मिरवणूक श्री गणेश सुवर्णधाम मंदिरासमोर पोहोचल्यानंतर बाप्पांची मूर्ती अत्यंत देखण्या आणि सुशोभित मखरात विराजमान करण्यात आली. प्रसिद्ध बासरी वादक पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या हस्ते बाप्पाची विधीवत प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी उपस्थित हजारो भाविकांनी बाप्पाचे दर्शन घेत आरतीचा लाभ घेतला. त्यानंतर श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे सचिव स्वामी गोविंदगिरी महाराज, खासदार सुप्रिया सुळे आदींनी श्री गणेश सुवर्णधाम मंदिरात येऊन श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. 

‘‘दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची बाप्पाची आगमन मिरवणूक अत्यंत उत्साहात पार पडली. ज्येष्ठ बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या शुभहस्ते गणरायाची प्राणप्रतिष्ठा झाली आहे. बाप्पाच्या आगमनाने आम्हाला अतिशय आनंद झाला असून पुढील दहा दिवस हा आनंद असाच कायम राहणार आहे. राज्यावरील सर्व विघ्न दूर कर आणि भरपूर पाऊस पडून सर्वत्र आनंदीआनंद व्हावा, सर्वांना सुख, शांती, आरोग्य, धनसंपदा लाभावी, अशी प्रार्थना आम्ही बाप्पाकडं केली.’’ अशी प्रतिक्रिया श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे उत्सवप्रमुख आणि विश्वस्त  पुनीत बालन यांनी दिली.

तर पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया म्हणाले ‘‘आज महाराष्ट्रात येऊन हिंदुस्थानातील पहिल्या गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना करण्याचं परमभाग्य मला लाभलं, त्यामुळे मी स्वतःला खूप भाग्यशाली समजतो. या पवित्र सोहळ्यात सहभागी होता आलं, हे माझं पूर्वसंचितच आहे. बाप्पाच्या चरणी मी हीच प्रार्थना करतो की, सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी, शांती आणि उत्तम आरोग्य लाभो.’’