व्यक्तिविशेष : बारामतीच्या सूनबाई ते महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री असा सुनेत्रा पवार यांचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. पडद्यामागून काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या ते राज्याच्या उपमुख्यमंत्री पदापर्यंतची त्यांची वाटचाल अनेकांसाठी चर्चेचा विषय ठरली आहे.
सुनेत्रा पवार यांचा जन्म 1963 मध्ये उस्मानाबाद म्हणजेच आताच्या धाराशिव जिल्ह्यातील एका राजकीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील बाजीराव पाटील आणि भाऊ पद्मसिंह पाटील हे मराठवाड्यातील मोठे नेते होते. त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून 1983 मध्ये बी.कॉमची पदवी घेतली. 1985 मध्ये त्यांचा विवाह अजित पवार यांच्याशी झाला. अजित पवार राजकारणात सक्रिय असताना सुनेत्रा पवार यांनी अनेक वर्षे स्वतःला थेट निवडणुकीच्या राजकारणापासून दूर ठेवले. त्यांनी बारामती आणि काटेवाडी परिसरात सामाजिक कामावर लक्ष केंद्रित केले.
काटेवाडी गावात उघड्यावर शौच आणि अस्वच्छता पाहून त्यांनी स्वच्छता अभियान हाती घेतले. त्यांच्या प्रयत्नांमुळे 2006 मध्ये काटेवाडीला निर्मल ग्राम पुरस्कार मिळाला. पुढे हेच गाव सोलर लाईट, बायोगॅस, घनकचरा व्यवस्थापन, भूमिगत गटार आणि देशातील पहिले सायबर ग्राम म्हणून विकसित झाले. बारामती हायटेक टेक्सटाईल पार्कच्या माध्यमातून त्यांनी सुमारे 6 हजार ग्रामीण महिलांना रोजगार मिळवून दिला. विद्या प्रतिष्ठान, पुणे जिल्हा शिक्षण मंडळ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन समितीवर काम करत त्यांनी ग्रामीण भागातील शिक्षणासाठी मोठे काम केले. घरावर महिलांच्या नावाच्या पाट्या लावून महिलांना घराची मालकीण बनवण्याची संकल्पनाही त्यांनीच राबवली.
2024 च्या लोकसभा निवडणुकीत बारामतीतून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढवून त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला. या निवडणुकीत पराभव झाला तरी त्यानंतर त्या राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून गेल्या. जानेवारी 2026 मध्ये अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी त्यांची एकमताने निवड झाली आणि 31 जानेवारी 2026 रोजी त्यांनी महाराष्ट्राच्या 11 व्या आणि पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
शांत, संयमी स्वभाव, उत्तम संघटन कौशल्य आणि सामाजिक कामाची जाण असलेल्या नेत्या म्हणून सुनेत्रा पवार यांच्याकडे पाहिले जाते. पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी पीएमआरडीएचा मास्टर प्लॅन गतिमान करण्यापासून ते महिला सक्षमीकरणापर्यंत त्यांनी घेतलेले निर्णय आता चर्चेत आहेत.