मुंबई : मुंबईतील नियोजित आंदोलनाला परवानगीशिवाय जाता येणार नाही असे स्पष्ट निर्देश हाय कोर्टाने मनोज जरांगे पाटील यांना दिले आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे शनिवारी राज्यव्यापी बैठक बोलावण्यात आली असून, या बैठकीत मुंबई आंदोलनाच्या तारखेची घोषणा होणार आहे. या पार्श्वभूमीवर दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणी घेताना कोर्टाने कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा लक्षात घेऊन महत्त्वाचा निर्णय दिला आहे.
या प्रकरणावरील सुनावणी दरम्यान हाय कोर्टाने म्हटले आहे की, मुंबईमध्ये कोणतेही आंदोलन करायचे असल्यास आधी संबंधित यंत्रणांची रीतसर परवानगी घेणे आवश्यक आहे. परवानगी घेतल्याशिवाय मुंबईत आंदोलन करता येणार नाही. आंदोलनामुळे मुंबईतील जनजीवन आणि वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो, तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा दावा याचिकेत करण्यात आला होता. त्याची दखल घेत न्यायालयाने प्रशासनाला योग्य ती खबरदारी घेण्यास सांगितले आहे. सोबतच न्यायालयाने मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची वैद्यकीय तपासणी करण्याचे आणि आवश्यकता भासल्यास त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्याचे निर्देशही प्रशासनाला दिले आहेत.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मुंबईत मोठे आंदोलन करण्याची भूमिका घेतली आहे. त्यानुसार अंतरवाली सराटी येथे मराठा बांधवांची राज्यव्यापी बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत राज्यभरातून मराठा समाजाचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असून, मुंबई आंदोलनाची दिशा, तारीख आणि नियोजन यावर चर्चा होणार आहे. बैठकीनंतर मुंबईकडे कूच करण्याची रणनीती जाहीर केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. जरांगे पाटील हे आपल्या आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम असल्याचे त्यांच्या सहकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
या संपूर्ण प्रकरणावर सरकारकडून देखील लक्ष ठेवले जात आहे. मुंबईसारख्या मोठ्या शहरात मोठ्या संख्येने आंदोलक आल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी सरकार आणि प्रशासन सज्ज असल्याची माहिती समोर येत आहे. आंदोलनाला परवानगी देण्याबाबतचा निर्णय नियमानुसार घेतला जाईल आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील, अशी भूमिका प्रशासनाकडून मांडण्यात आली आहे.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 14 वा दिवस आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून ते अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत. त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर येत असून, डॉक्टरांकडून नियमित तपासणी सुरू आहे. असे असतानाही ते आंदोलनावर ठाम आहेत. सध्या अंतरवाली सराटी येथे राज्यभरातून मराठा बांधव मोठ्या संख्येने दाखल होत असून, परिसरात मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. उद्याच्या राज्यव्यापी बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.