जालना : मराठा समाजाचा मोर्चा मुंबईत धडकणारच असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी आज अंतरवाली सराटी येथे दिला आहे. बारा सप्टेंबर रोजी होणाऱ्या बैठकीनंतर मुंबईत जाण्याची तारीख जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर मराठा उपसमितीचे अध्यक्ष आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मंत्री विखे पाटील म्हणाले की एसईबीसी अंतर्गत दिलेल्या दहा टक्के आरक्षणाचा मराठा समाजातील तरुणांना मोठा फायदा होत आहे. या आरक्षणाला कोणत्याही न्यायालयात स्थगिती मिळू नये यासाठी सरकारने विशेष लक्ष घातले आहे. त्यामुळे आरक्षणाचा लाभ मिळतच नाही ही वस्तुस्थिती नाही. मराठा समाजातील मुलांना या आरक्षणातून नोकरी आणि शिक्षणात संधी मिळत आहे.
मनोज जरांगे यांनी काही नेत्यांवर पक्षाची बाजू घेत असल्याचा आरोप केला होता. त्यावर विखे पाटील म्हणाले की त्या वादात पडण्याचे कारण नाही. ज्या मागण्या समोर आल्या आहेत त्यांची पूर्तता करण्याचे काम सरकार करत आहे. आणखी काही मागण्या असतील तर त्याचाही सरकार विचार करेल. आमचे सहकारी या विषयावर लक्ष ठेवून आहेत आणि अंतिम अहवाल आल्यावर निर्णय घेतला जाईल.
यावेळी त्यांनी राज्यातील कमी पावसाच्या परिस्थितीवर पण भाष्य केले. शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या होत्या, पिके चांगली होती पण आता पावसाअभावी सोयाबीनसह इतर पिके सुकत आहेत. परिस्थिती गंभीर असून मुख्यमंत्री याबाबत गंभीर आहेत. सध्या पिण्याचे पाणी राखून ठेवले असून उरलेले पाणी शेतीसाठी देण्याची परवानगी दिली आहे. पंचनाम्याचा अहवाल आल्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीत पुढील निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.