वास्तुशास्त्र : मुलांचा अभ्यासात मन लागत नाही का ? वास्तुशास्त्रानुसार स्टडी टेबलची दिशा बदला, मिळेल यश ! - टॉप न्यूज मराठी

वास्तुशास्त्र : प्रत्येक आई वडिलांना वाटते की आपल्या मुलाने खूप अभ्यास करावा आणि चांगले मार्क मिळवावेत. पण अनेक वेळा खूप अभ्यास करूनही मुलांचे मन लागत नाही, अभ्यास केलेले लक्षात राहत नाही आणि परीक्षेत मार्क कमी येतात. यामागे अनेक कारणे असू शकतात, त्यातील एक कारण वास्तुदोष देखील असू शकते असे वास्तुशास्त्र सांगते. मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत काही छोटे बदल केले तर त्यांच्या एकाग्रतेत वाढ होऊ शकते.

अभ्यास करताना तोंड कोणत्या दिशेला असावे

वास्तुशास्त्रानुसार अभ्यास करताना मुलांचे तोंड हे नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे. पूर्व दिशा ही सूर्याची दिशा आहे आणि ती ज्ञान आणि उर्जेची दिशा मानली जाते. या दिशेला तोंड करून अभ्यास केल्याने एकाग्रता वाढते आणि स्मरणशक्ती चांगली होते. उत्तर दिशा ही कुबेर आणि बुद्धीची दिशा मानली जाते. त्यामुळे या दोन दिशा अभ्यासासाठी सर्वात शुभ मानल्या जातात. चुकूनही दक्षिण किंवा पश्चिम दिशेला तोंड करून अभ्यास करू नये, त्यामुळे आळस येतो आणि मन भटकते.

स्टडी टेबल कुठे असावा

मुलांचे स्टडी टेबल हे नेहमी खोलीच्या पश्चिम किंवा नैऋत्य कोपऱ्यात असावे आणि बसताना तोंड पूर्वेकडे येईल असे ठेवावे. टेबल भिंतीला चिकटवून ठेवू नये, भिंत आणि टेबलमध्ये थोडे अंतर असावे. टेबलावर कधीही जास्त सामान, फाटलेली पुस्तके किंवा बंद घड्याळ ठेवू नये. टेबल नेहमी स्वच्छ आणि आवरलेले असावे.

खोलीचा रंग आणि इतर टिप्स

अभ्यासाच्या खोलीचा रंग हा हलका पिवळा, हलका हिरवा किंवा पांढरा असावा. हे रंग सकारात्मक उर्जा देतात. लाल आणि काळा रंग टाळावा. मुल जिथे बसते त्याच्या समोर आरसा किंवा खिडकी नसावी, त्यामुळे लक्ष विचलित होते. अभ्यासाच्या टेबलावर सरस्वती माता किंवा गणपती बाप्पाचा छोटा फोटो लावावा. तसेच क्रिस्टलचा ग्लोब ठेवल्याने देखील एकाग्रता वाढते असे मानले जाते. मुलांनी अभ्यास करताना पायात चप्पल घालू नये आणि पाय हलवू नयेत.

बेडरूममध्ये अभ्यास टाळा

अनेक मुले बेडवर बसून अभ्यास करतात पण हे पूर्णपणे चुकीचे आहे. बेड हा झोपण्यासाठी असतो, तिथे बसून अभ्यास केल्याने झोप येते आणि अभ्यास होत नाही. त्यामुळे नेहमी खुर्ची टेबलवर बसूनच अभ्यास करावा.

डिस्क्लेमर - हा लेख वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रातील सामान्य मान्यतांवर आधारित आहे. यातील उपायांचा अवलंब करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ञाचा सल्ला घ्यावा. कोणत्याही अंधश्रद्धेला खतपाणी घालणे हा आमचा उद्देश नाही. मुलांच्या अभ्यासासाठी सातत्य, मेहनत आणि योग्य मार्गदर्शन हे सर्वात महत्त्वाचे आहे.