पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, चांदणी चौक ते हिंजवडी मेट्रोचा डीपीआर तयार होणार, दिशा बैठकीत मोहोळ यांचे निर्देश - टॉप न्यूज मराठी

पुणे : पुणे शहर आणि मुळशी, पिरंगुट परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. चांदणी चौक ते घोटवडे फाटा, पिरंगुट मार्गे हिंजवडी मेट्रोचा सविस्तर प्रकल्प अहवाल म्हणजेच डीपीआर तयार करण्याचे निर्देश केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या दिशा समितीच्या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले.

जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती म्हणजेच दिशाची बैठक आज मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे या ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होत्या. पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आमदार आणि वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत मोहोळ यांनी प्रलंबित कामांना कालबद्ध गती द्या अशा सूचना दिल्या.

मेट्रोसाठी महत्त्वाचे निर्णय काय झाले

पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील कामांना गती देण्यासाठी मोहोळ यांनी सूचना केल्या आहेत. वनाज ते चांदणी चौक या उन्नत मार्गासाठी पुणे महापालिकेने आर्थिक सहमती द्यावी, रामवाडी ते वाघोली मार्गिकेला मान्यता द्यावी आणि लोहगाव विमानतळ मेट्रो जोडणीचा डीपीआर लवकर पूर्ण करावा असे त्यांनी सांगितले. यासोबतच सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे चांदणी चौक, घोटवडे फाटा, पिरंगुट ते हिंजवडी या नवीन मेट्रो मार्गाचा डीपीआर तयार करण्याचे निर्देश दिले. या मार्गाला खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील अनुमोदन दिले असून हा मार्ग गरजेचा असल्याचे त्यांनी सांगितले. हा मार्ग झाला तर मुळशी आणि हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांचा प्रवास खूप सोपा होणार आहे.

इतर योजनांचा आढावा

या बैठकीत प्रधानमंत्री आवास योजनेचाही आढावा घेण्यात आला. शहरी भागात 3227 अर्ज पात्र ठरले असून मामुर्डी, पुनावळे, ताथवडे येथील 6800 घरांचे भूसंपादन लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले. ग्रामीण आवास योजनेत 91 टक्के काम पूर्ण झाले आहे. भारतनेट योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 1400 ग्रामपंचायतींना इंटरनेटने जोडण्यासाठी कालबद्ध आराखडा तयार करण्यास सांगितले आहे. स्वामित्व योजनेत 1100 गावांची ड्रोन मोजणी पूर्ण झाली असून 829 गावांतील 1 लाख 13 हजार मिळकत पत्रिका तयार झाल्या आहेत. उर्वरित पत्रिका तीन महिन्यांत वाटण्याच्या सूचना दिल्या आहेत.

जलजीवन मिशनअंतर्गत 1239 योजना सुरु असून 39 हजार नळ जोडण्या बाकी आहेत. त्या मार्च 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे टार्गेट दिले आहे. याशिवाय पुरंदर विमानतळासाठी 70 टक्के भूसंपादन पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. एकूणच पुणे जिल्ह्यातील सर्व केंद्र पुरस्कृत योजनांना गती देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे.