व्यक्तिविशेष : डॉक्टर, अभिनेता ते दोन वेळा खासदार, डॉ. अमोल कोल्हे यांचा नारायणगाव ते दिल्लीपर्यंतचा थक्क करणारा प्रवास - टॉप न्यूज मराठी
व्यक्ती विशेषमध्ये आज आपण अशा व्यक्तीबद्दल बोलणार आहोत ज्याने डॉक्टरकी, अभिनय आणि राजकारण या तिन्ही क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. ते म्हणजे शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे.
जन्म आणि फॅमिली बॅकग्राऊंड
- अमोल रामसिंग कोल्हे यांचा जन्म 18 सप्टेंबर 1980 रोजी पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथे झाला. त्यांचे वडील रामसिंग भाऊजी कोल्हे हे पाटबंधारे विभागात नोकरीला होते आणि आई रंजना कोल्हे या गृहिणी आहेत. मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या अमोल कोल्हे यांना लहानपणापासूनच इतिहासाची आणि वाचनाची खूप आवड होती.
शिक्षण
- त्यांचे आठवीपर्यंतचे शिक्षण नारायणगावातच झाले. पुढे शिक्षणासाठी ते पुण्यात आले. पुण्यातील आपटे प्रशालेत त्यांनी 9 वी ते 12 वी पर्यंतचे शिक्षण विज्ञान शाखेत घेतले. ते 10 वी आणि 12 वी मध्ये गुणवत्ता यादीत होते. एवढेच नाही तर राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा देखील त्यांनी उत्तीर्ण केली होती. पुढे त्यांनी मुंबईतील प्रसिद्ध सेठ गोवर्धनदास सुंदरदास मेडिकल कॉलेज आणि केईएम हॉस्पिटलमधून एमबीबीएसची पदवी घेतली. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी काही काळ डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस देखील केली.
फॅमिली
- अमोल कोल्हे यांचे लग्न 2007 साली डॉ. अश्विनी कोल्हे यांच्यासोबत झाले. डॉ. अश्विनी या देखील डॉक्टर असून वैद्यकीय महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक आहेत. या दाम्पत्याला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुले आहेत.
मनोरंजन क्षेत्रातील कारकीर्द
- डॉक्टरकी सोडून त्यांनी अभिनयाची वाट निवडली. सुरुवातीला त्यांनी नाटकांमधून कामाला सुरुवात केली. भगवा नृत्य नाट्य, शिवपुत्र संभाजी या नाटकातून ते प्रसिद्ध झाले. त्यानंतर त्यांनी टीव्हीवर अधुरी एक कहाणी, ह्या गोजिरवाण्या घरात या मालिकांमध्ये काम केले.
त्यांना खरी ओळख मिळाली ती स्टार प्रवाह वरील राजा शिवछत्रपती या मालिकेमुळे. या मालिकेत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आणि ते घराघरात पोहोचले. त्यानंतर झी मराठीवरील स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेत त्यांनी संभाजी महाराजांची भूमिका केली. ही मालिका इतकी गाजली की लोक त्यांना खरे संभाजी महाराजच मानू लागले. या मालिकेसाठी त्यांनी स्वतःचे घर विकल्याचीही चर्चा आहे. त्यांनी व्हाय आय किल्ड गांधी या चित्रपटात नथुराम गोडसेची वादग्रस्त भूमिका देखील केली होती.
राजकीय क्षेत्रातील कारकीर्द
- अभिनयासोबतच त्यांचा राजकारणात प्रवेश झाला. 2014 साली त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि ते पुणे जिल्ह्याचे संपर्कप्रमुख आणि स्टार प्रचारक बनले. पण 2019 च्या लोकसभा निवडणुकीआधी त्यांनी शिवसेना सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
- 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीने त्यांना शिरूर लोकसभेची उमेदवारी दिली आणि त्यांनी शिवसेनेचे तीन वेळा खासदार राहिलेले शिवाजीराव आढळराव पाटील यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला.
- 2024 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर ते शरद पवार यांच्यासोबत राहिले आणि पुन्हा शिरूरमधून दुसऱ्यांदा खासदार झाले. सध्या ते लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उपनेते आणि मुख्य प्रतोद म्हणून काम पाहत आहेत. संसदेतील त्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणांसाठी ते नेहमीच चर्चेत असतात.