व्यक्तीविशेष : महाराष्ट्रात लावणी म्हटली की डोळ्यासमोर येते ते म्हणजे पारंपरिक ठसका आणि अदाकारी. याच लावणीला नव्या पिढीच्या स्टाईलने सादर करून घराघरात पोहोचलेले नाव म्हणजे गौतमी पाटील. सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स असलेल्या गौतमीच्या आयुष्याचा प्रवास हा सोपा नव्हता.
गौतमी पाटीलचा जन्म 4 फेब्रुवारी 1996 रोजी धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा या छोट्याशा गावात झाला. ती एका सामान्य मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातून आलेली आहे. तिचे बालपण खूप संघर्षात गेले. वडिलांच्या व्यसनाधीनतेमुळे तिच्या आई वडिलांमध्ये वाद होऊन ते वेगळे झाले. त्यानंतर तिचा सांभाळ तिची आई आणि मामाने केला. गौतमी ही कुटुंबातील पहिली नर्तकी आहे, तिच्या आधी कुटुंबात कोणीही या क्षेत्रात नव्हते. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने तिच्या आईला पाण्याच्या बाटल्या पॅकिंग करण्याच्या कंपनीत काम करावे लागले. एकदा आईला अपघात झाल्यावर घरची जबाबदारी आणखीनच वाढली.
गौतमीचे सुरुवातीचे शिक्षण शिंदखेडा येथील पब्लिक स्कूल मध्ये झाले. नंतर उच्च शिक्षणासाठी ती पुण्यात आली. ती आठवी इयत्तेत असताना तिचे कुटुंब पुण्यात स्थायिक झाले. तिने राजश्री शाहू विद्या मंदिर पुणे येथे शिक्षण घेतले. तिला लहानपणापासूनच अभ्यासापेक्षा नृत्यात जास्त रस होता. शाळेत असताना ती सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्यायची. पदवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर तिने आर्थिक अडचणींमुळे शिक्षण थांबवून पूर्णवेळ नृत्यावर लक्ष केंद्रित केले. तिने कोणतेही शास्त्रीय नृत्याचे प्रशिक्षण घेतलेले नाही, ती स्वकष्टाने शिकली आहे.
गौतमीला लहानपणापासूनच नृत्य कलेची खूप आवड होती. वयाच्या दहाव्या वर्षापासून तिने स्टेजवर परफॉर्म करायला सुरुवात केली होती. तिला लावणी, कोळीगीत आणि लोकधारा या पारंपरिक नृत्य प्रकारांबद्दल आकर्षण होते. सुरुवातीला तिने लावणी ग्रुपमध्ये बॅक डान्सर म्हणून काम केले. वयाच्या 15 व्या वर्षी तिला अकलूज लावणी महोत्सवात पहिल्यांदा स्टेज मिळाला, जरी तेव्हा तिच्याकडून काही चुका झाल्या तरी तिने हार मानली नाही. ती पुण्यातील विश्वकला डान्स अकॅडमीमध्ये सराव करायची.
गौतमी पाटीलचा खरा संघर्ष पुण्यात आल्यावर सुरू झाला. ती छोट्या छोट्या यात्रा, जत्रा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये नाचायची. तिचा गौतमी पाटील ऑर्केस्ट्रा शो हळूहळू लोकप्रिय होऊ लागला.
2022 मध्ये सांगली येथील एका कार्यक्रमाचा तिचा व्हिडिओ सोशल मीडिया आणि टिकटॉकवर प्रचंड व्हायरल झाला. तिची डीजेवर लावणी आणि बॉलिवूड गाण्यांवर वेस्टर्न स्टेप्स टाकण्याची स्टाईल लोकांना खूप आवडली. त्यानंतर तिला पुणे, कोल्हापूर, सातारा येथून कार्यक्रमांसाठी बोलावणे येऊ लागले. आज ती महिन्याला 22 ते 25 शो करते आणि एका शोचे जवळपास 2 लाख रुपये मानधन घेते.
तिच्या सर्वात लोकप्रिय परफॉर्मन्सपैकी एक म्हणजे सबसे कातिल गौतमी पाटील. तिच्या शोला गर्दी इतकी होते की अनेकदा पोलिसांना अतिरिक्त बंदोबस्त लावावा लागतो.
प्रसिद्धीसोबत वादही आले. तिच्या बोल्ड डान्स स्टेप्सवर टीका झाली, तिचे नृत्य मराठी संस्कृतीला शोभत नाही असेही म्हटले गेले. दहीहंडी उत्सवातील तिच्या एका व्हिडिओवरून मोठा वाद निर्माण झाला होता. मात्र गौतमीने खूप नम्रपणे माफी मागून आपल्या चाहत्यांची मन जिंकली. ती म्हणते माझे नृत्य हे केवळ लावणी नाही तर डीजेवरचे डान्स आहे.
आज गौतमी पुण्यात तिच्या आईसोबत राहते. ती अविवाहित आहे. सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे, इंस्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. ती डान्सर सोबतच इन्फ्लुएन्सर आणि कंटेंट क्रिएटर म्हणूनही काम करते. तिची अंदाजे संपत्ती 50 लाखांच्या आसपास आहे. गौतमी पाटीलची कहाणी ही एका छोट्या गावातील मुलगी जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर महाराष्ट्राची डान्स क्वीन कशी बनली याचे उत्तम उदाहरण आहे.
माहिती स्रोत - इंटरनेट