कात्रज-कोंढवा रोडवर भीषण अपघात, वडिलांसोबत दुचाकीवरून जाणाऱ्या चिमुकलीचा दुर्दैवी अंत, बहिण आणि वडील जखमी - टॉप न्यूज मराठी

पुणे : कात्रज कोंढवा रोडवर आज सकाळी एक भीषण अपघात झाला. कपिलामृत डेअरी समोर यु टर्न घेत असताना एका दुचाकीला कंटेनरने धडक दिली. या अपघातात एका लहान मुलीचा मृत्यू झाला असून तिचे वडील आणि बहिण जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, MH 12 ZM 3579 या दुचाकीवरून वडील त्यांच्या दोन मुलींना घेऊन जात होते. कपिलामृत डेअरी समोरून ते यु टर्न घेत असताना कात्रजकडून कोंढव्याकडे जाणारा HR 38 W 6977 क्रमांकाचा कंटेनर समोर आला. दुचाकी थेट कंटेनरच्या समोरच्या चाकाखाली आली. या धडकेत वडील आणि एक मुलगी वैष्णवी नाईक किरकोळ जखमी झाली. तर दुसरी मुलगी प्रतिभा नाईक हिला गंभीर दुखापत झाली. तिला तात्काळ भारती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान तिचा दुर्दैवी अंत झाला.

घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी कंटेनर चालक आणि कंटेनर ताब्यात घेतला असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.