मुंबई : राज्यातील भरती परीक्षांमध्ये वारंवार होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी आणि परीक्षा अधिक पारदर्शक करण्यासाठी राज्य सरकारने उच्चस्तरीय टास्क फोर्स तयार केला आहे. या टास्क फोर्सने आता थेट विद्यार्थ्यांशी बोलण्याचा निर्णय घेतला आहे.
या महिन्यात टास्क फोर्स राज्यातील सहा विभागांना भेट देणार आहे. पुणे, नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, कोकण आणि नाशिक या ठिकाणी जाऊन विद्यार्थी, स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे उमेदवार, पालक आणि शिक्षकांशी थेट चर्चा करणार आहे. विद्यार्थ्यांना नेमक्या काय अडचणी येतात आणि परीक्षेत काय सुधारणा हव्या आहेत हे जाणून घेतले जाणार आहे.
पहिली भेट 12 सप्टेंबरला पुणे विभागात होणार आहे, त्यानंतर 16 ला नागपूर, 17 ला अमरावती, 21 ला संभाजीनगर, 29 ला कोकण आणि 30 सप्टेंबरला नाशिक विभागात बैठक होईल. विद्यार्थ्यांना आपल्या सूचना थेट ईमेलवरही पाठवता येणार आहेत. या सर्व सूचनांवर अभ्यास करून सरकारला अहवाल दिला जाणार आहे, जेणेकरून भविष्यात भरती परीक्षा सुरक्षित आणि विद्यार्थ्यांसाठी सोप्या होतील.