पुणे : पुणे रेल्वे स्थानक परिसरात एका पोलीस शिपायावर गांजा पिणाऱ्या टोळक्याने कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात पोलीस कर्मचारी अक्षय बांबल हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. थेट पोलिसावरच हल्ला झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
पुणे रेल्वे स्थानकाच्या हद्दीत रेल्वे रुळांच्या बाजूला काही तरुण बसून गांजा पीत असल्याचे ड्युटीवर असलेले पोलीस शिपाई अक्षय बांबल यांच्या निदर्शनास आले. त्यांनी त्या ठिकाणी जाऊन त्या टोळक्याला तेथून निघून जाण्यास सांगितले आणि हटकले. त्यावेळी नशेत असलेल्या टोळक्याने वाद घालण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि टोळक्यातील एकाने जवळ असलेल्या धारदार कोयत्याने थेट अक्षय बांबल यांच्या गळ्यावर वार केला. या हल्ल्यात बांबल हे रक्ताच्या थारोळ्यात पडले. आजूबाजूच्या लोकांनी धाव घेऊन त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. ही घटना समोर येताच पुण्यातील कायदा सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
या घटनेची माहिती मिळताच लोहमार्ग आणि पुणे शहर पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. जखमी पोलिसाचा जबाब नोंदवून घेण्यात आला असून हल्ला करून पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरू करण्यात आला आहे. रेल्वे स्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून लवकरच आरोपींना अटक केली जाईल अशी माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.