'रामायणातील' गुरु वशिष्ठ आणि 'साई बाबा' फेम सुधीर दळवींची प्रकृती चिंताजनक, साई ट्रस्ट आणि बॉलिवूड कलाकार धावले मदतीला - टॉप न्यूज मराठी

मुंबई : 86 वर्षीय ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी सध्या गंभीर आजाराशी झुंज देत आहेत. सेप्सिस या जीवघेण्या संसर्गामुळे त्यांची प्रकृती अत्यंत खालावली होती. सध्या ते रुग्णालयातून घरी परतले असले तरी प्रकृती पूर्णपणे पूर्ववत झालेली नाही. त्यांना चालण्यासाठी अजूनही वॉकरचा आधार घ्यावा लागतो आणि त्यांची मानसिक स्थितीही अजून स्थिर झालेली नाही.

सुधीर दळवी हे टीव्ही आणि सिनेसृष्टीतील नावाजलेले अभिनेते आहेत. रामानंद सागर यांच्या 'रामायण' मालिकेतील गुरु वशिष्ठ आणि 1977 मधील गाजलेल्या 'शिर्डी के साई बाबा' चित्रपटातील साई बाबा या त्यांच्या अविस्मरणीय भूमिकांमुळे ते घराघरात पोहोचले. त्यांना 7 ऑक्टोबर 2025 रोजी सेप्सिस झाल्याने मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हा संसर्ग वेगाने शरीरात पसरतो आणि जीवाला धोका निर्माण करतो. या आजाराचा त्यांच्या सांध्यांवर परिणाम झाल्याने त्यांना हालचाल करणेही कठीण झाले होते.

प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना अतिदक्षता विभागात ठेवावे लागले. ते जवळपास एक महिना रुग्णालयात होते. मीडिया रिपोर्टनुसार, रुग्णालयाचे बिल सुरुवातीला 10 लाखांच्या वर गेले आणि नंतर ते 19 लाखांपेक्षा जास्त झाले. यावर त्यांच्या पत्नी सुहास दळवी म्हणाल्या, "बिल भरणे अशक्य होत चालले होते. या कठीण काळात उपचार सुरू ठेवणे आणि खर्च पेलणे हे दुहेरी आव्हान होते."

या कठीण प्रसंगात सिनेसृष्टी मदतीला धावली. पत्नी सुहास दळवी यांनी सांगितले की, कार्तिक आर्यन, रणबीर कपूर आणि अक्षय कुमार हे मदतीसाठी सर्वात आधी पुढे आले. तसेच अनेक साई भक्तांनीही मदत केली. दरम्यान, डिसेंबर 2025 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या परवानगीने श्री साईबाबा संस्थान ट्रस्टने त्यांच्या उपचारासाठी 11 लाख रुपयांची मदत दिली.