विशाखा राऊत यांचं नगरसेवक पद अखेर रद्द ! मुंबई हायकोर्टाने याचिका फेटाळली, ठाकरे गटाला मोठा धक्का - टॉप न्यूज मराठी

मुंबई : शिवसेना (UBT) ठाकरे गटाला मुंबईत आणखी एक मोठा धक्का बसला आहे. माजी महापौर आणि ठाकरे गटाच्या ज्येष्ठ नेत्या विशाखा राऊत यांचे नगरसेवक पद अखेर रद्द झाले आहे. मुंबई हायकोर्टाने त्यांची याचिका फेटाळल्याने त्यांना हा मोठा झटका बसला आहे.

नेमकं प्रकरण काय ?

विशाखा राऊत या मुंबई महापालिकेतील प्रभाग क्रमांक 191, दादर-शिवाजी पार्क या अत्यंत महत्त्वाच्या वार्डमधून नगरसेविका आहेत. हा वार्ड OBC महिला प्रवर्गासाठी राखीव होता. राऊत यांनी निवडणूक लढवताना OBC - कुणबी असल्याचे जात प्रमाणपत्र दिले होते. या प्रमाणपत्रावर शिंदे गटाच्या उमेदवार प्रिया सरवणकर (माजी आमदार सदा सरवणकर यांच्या कन्या) यांनी आक्षेप घेतला होता. त्यांनी तक्रार केली होती की, विशाखा राऊत यांचे मूळ गाव मुंबई असताना त्यांनी पालघरच्या SDO कडून प्रमाणपत्र कसे मिळवले ? या तक्रारीनंतर पालघरच्या जात पडताळणी समितीने 21 ऑगस्ट रोजी विशाखा राऊत यांचे OBC प्रमाणपत्र अवैध ठरवले. समितीने म्हटले की, पालघरच्या SDO ला त्यांना प्रमाणपत्र देण्याचा अधिकारच नव्हता. त्यानंतर महापालिकेने त्यांचे पद रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली, त्याविरोधात राऊत यांनी हायकोर्टात धाव घेतली होती, पण कोर्टाने ती याचिका फेटाळली.

विशाखा राऊत यांनी दादरमध्ये प्रिया सरवणकर यांचा अवघ्या 197 मतांनी पराभव केला होता. आता त्यांचे पद रद्द झाल्यामुळे या जागेवर पोटनिवडणूक होण्याची किंवा दुसऱ्या क्रमांकाच्या उमेदवाराला संधी मिळण्याची शक्यता आहे. विशाखा राऊत या ठाकरे कुटुंबाच्या अत्यंत जवळच्या मानल्या जातात आणि माजी महापौर राहिलेल्या आहेत. गेल्या दोन महिन्यात जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने अपात्र ठरलेल्या त्या 5 व्या विरोधी पक्षाच्या नगरसेविका आहेत.