पुणे : जिल्ह्यात प्राणी क्रूरतेच्या घटना रोखण्यासाठी जिल्हास्तरावर प्रभावी नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीची बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या बैठकीत प्राणी क्रूरतेच्या तक्रारींचे वेळेत आणि नियमानुसार निवारण करणे तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.
बैठकीला पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. राजेशकुमार वासनिक, सहायक आयुक्त विष्णू गर्जे यांच्यासह पोलीस, महापालिका, नगरपालिका आणि ग्रामपंचायत विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
गेल्या वर्षभरात समितीकडे 13 तक्रारी प्राप्त झाल्या असून सर्व तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.