अंतरवली सराटी : "...फाशी घ्यावी लागली तरी चालेल !" हे काय बोलून गेल्या जालना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, जरांगे पाटील संतापलेच - टॉप न्यूज मराठी

अंतरवली सराटी : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे आंतरवाली सराटीतील उपोषण आज पाचव्या दिवशी पोहोचले आहे. गेल्या पाच दिवसांपासून अन्नत्याग केल्याने त्यांची तब्येत मोठ्या प्रमाणात खालावली असून अशक्तपणा वाढला आहे. यादरम्यान जालन्याच्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल आणि पोलीस अधीक्षक यांनी त्यांची भेट घेऊन समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी चर्चेदरम्यान मित्तल यांनी, मनोजजी नोकरी करताना फाशी घेण्याची वेळ आली तरी माझी तयारी आहे, असे धक्कादायक वक्तव्य केले, ज्यामुळे सभास्थळी एकच शांतता पसरली.

जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी सरकारची भूमिका मांडताना सरकारने मराठा आरक्षणासाठी आतापर्यंत काय काय पावले उचलली आहेत याची माहिती जरांगे पाटील यांना दिली. हे सांगत असतानाच जरांगे यांनी त्यांना थेट प्रश्न विचारला की तुम्ही सरकारची बाजू घ्यायला इथे आला आहात का? यावर मित्तल यांनी हे माझे काम आहे असे उत्तर दिले. त्यानंतर जरांगे यांनी सरकारवर टीका करताना म्हटले की सरकारमुळे चांगल्या चांगल्या लोकांना फाशी घेण्याची वेळ आली आहे. त्यांच्या या वक्तव्याचा अर्थ मित्तल यांना आपल्याबद्दल बोलत आहेत असा वाटला आणि त्यांनी लगेच प्रतिक्रिया देताना नोकरीसाठी फाशी घेण्याचीही तयारी असल्याचे सांगितले.

जिल्हाधिकाऱ्यांचे हे वक्तव्य ऐकताच मनोज जरांगे पाटील यांनी त्यांना लगेच थांबवले आणि समजावून सांगितले. जरांगे म्हणाले, तुम्ही जिल्हाधिकारी आहात, तुम्ही अशी फाशीची भाषा बोलू नका. एक प्रश्न सोडवता आला नाही म्हणून तुमच्यावर टीका होईल. तुम्ही रात्रंदिवस अभ्यास करून UPSC-MPSC पास होऊन इथपर्यंत पोहोचलेल्या मोठ्या झालेल्या लेकरं आहात. सरकारमध्ये चौथी नापास लोक मंत्री आहेत, जे तुम्हाला शिकवून इथे पाठवत आहेत, त्यांची पुस्तकेही त्यांना वाचता येणार नाहीत. तुम्ही कशाला या भानगडीत पडता असे म्हणत त्यांनी मित्तल यांना या राजकीय वादापासून दूर राहण्याचा सल्ला दिला.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत असली तरी ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. सरकारसोबतच्या चर्चेच्या फेऱ्या सुरू असल्या तरी तोडगा निघत नसल्याने त्यांनी आता मुंबईकडे कूच करण्याचा इशारा दिला आहे. येत्या 12 सप्टेंबरला ते मुंबईत येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले असून मराठा समाजाच्या मुलांनी हळूहळू मुंबईकडे रवाना व्हावे अशा सूचना दिल्या आहेत. मात्र आंदोलनादरम्यान कोणीही आझाद मैदानावर जाऊ नये असे आवाहनही त्यांनी केले आहे.