आलिशान घरांकडे ग्राहकांचा वाढता कल, परवडणाऱ्या घरांच्या मागणीत घट; 'केअरएज रेटिंग्ज'चा अहवाल - टॉप न्यूज मराठी

देशातील निवासी बांधकाम क्षेत्रात संरचनात्मक बदल होत असून, ग्राहकांचा कल आता आलिशान, प्रीमियम घरांकडे वाढत आहे. दुसरीकडे, प्रमुख शहरांमध्ये एकूण घरांच्या विक्रीचा वेग काहीसा मंदावला आहे. बांधकाम व्यावसायिकांकडूनही नव्या प्रकल्पांमध्ये आलिशान घरांना अधिक प्राधान्य दिले जात आहे, असे 'केअरएज रेटिंग्ज'च्या अहवालात म्हटले आहे.

देशातील प्रमुख शहरांमध्ये १.५ कोटी रुपयांपेक्षा कमी किमतीच्या घरांचा नव्या प्रकल्पांमधील वाटा २०२२ च्या पहिल्या तिमाहीत (जानेवारी-मार्च) तब्बल ८५ टक्के होता, जो २०२५ च्या पहिल्या तिमाहीत ५० टक्क्यांवर आणि २०२६ च्या पहिल्या तिमाहीत आणखी घसरून केवळ ४७ टक्क्यांवर आला आहे. याउलट, रिअल इस्टेट क्षेत्रात प्रीमियम आणि आलिशान घरांचे वर्चस्व झपाट्याने वाढत असल्याचे चित्र आहे. १.५ ते ४ कोटी रुपये किमतीच्या घरांचा नव्या प्रकल्पांमधील वाटा २०२२ च्या पहिल्या तिमाहीत केवळ १४ टक्के होता, तो २०२६ च्या पहिल्या तिमाहीत थेट ४४ टक्क्यांवर पोहोचला आहे. याच कालावधीत, ४ कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या अति-आलिशान घरांच्या वाट्यातही मोठी वाढ झाली असून, हा वाटा एक टक्क्यावरून नऊ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. 

चेन्नईमध्ये घरांच्या विक्रीत सर्वाधिक नऊ टक्के वाढ झाली असून, बंगळुरू व कोलकत्यात प्रत्येकी पाच टक्के, अहमदाबादमध्ये दोन टक्के आणि हैदराबादमध्ये एक टक्का वाढ नोंदवली गेली आहे. याउलट, पुणे आणि दिल्ली-एनसीआरमध्ये घरांच्या विक्रीत प्रत्येकी २२ टक्के, तर मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) सात टक्क्यांची लक्षणीय घट झाली आहे. पुणे, दिल्ली-एनसीआर आणि मुंबईमधील या घसरणीमागे गेल्या काही वर्षांतील घरांच्या किमतींमधील सातत्यपूर्ण वाढ, वाढत्या किमतींमुळे गृहखरेदी परवडण्यावरील दबाव, आणि भू-राजकीय तसेच वित्तीय बाजारातील अनिश्चिततेमुळे ग्राहकांनी घेतलेला सावध दृष्टिकोन ही प्रमुख कारणे आहेत. एकूणच, निवासी बांधकाम बाजारात घरांची मागणी संपलेली नसली, तरी 'परवडणारे घर' ते 'प्रीमियम घर' असा ग्राहकांच्या पसंतीचा बदल आता अधिक स्पष्ट होत आहे; ज्यामुळे आगामी काळात बांधकाम व्यावसायिकांच्या नव्या प्रकल्पांच्या धोरणावर आणि घरांच्या किमतींवर या बदलाचा मोठा प्रभाव पडण्याची शक्यता आहे.

भारतीय निवासी बांधकाम बाजारात २०२२ पासून प्रीमियम आणि आलिशान घरांच्या मागणीकडे ग्राहकांचा कल सातत्याने वाढत असून, यामुळे परवडणाऱ्या घरांच्या विभागातील दरी अधिक रुंदावत चालली आहे. वर्ष २०२६ च्या पहिल्या तिमाहीत देशातील प्रमुख सात शहरांमधील घरांची एकूण विक्री गेल्या वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत कमी एक अंकी टक्क्याने घटली आहे. उच्च उत्पन्न गटातील ग्राहकांवर महागाईचा परिणाम तुलनेने कमी झाल्यामुळे प्रीमियम आणि आलिशान घरांच्या मागणीला मोठा आधार मिळाला आहे. दुसरीकडे, वाढती महागाई, मालमत्तांच्या व जमिनींच्या वाढलेल्या किमती आणि बांधकाम खर्च वाढल्यामुळे परवडणाऱ्या तसेच मध्यम उत्पन्न गटातील घरांची मागणी आणि खरेदी क्षमता या दोन्हीवर मोठा दबाव आला आहे, ज्यामुळे या विभागातील विक्रीत घट झाली आहे.