आजच्या धावपळीच्या जीवनात आपली जीवनशैली पूर्णपणे बदलली आहे. चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव आणि तणाव यामुळे मधुमेह, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब आणि हृदयरोग यांसारखे आजार घराघरात पोहोचले आहेत. यावर महागडी औषधे घेण्यापेक्षा योग्य आणि पौष्टिक आहार घेतला तर हे आजार नियंत्रणात ठेवता येतात. अशाच एका सुपरफूडची माहिती आज घेऊयात ! ते म्हणजे मोड आलेल्या कडधान्यांपासून बनवलेली स्प्राऊट्स चाट. ही चाट फक्त चवदारच नाही तर प्रोटीनचा खजिना आहे. यामध्ये शरीराला लागणारे सर्व आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबर मुबलक प्रमाणात असतात.
कडधान्याला मोड आणल्याने त्याची पौष्टिकता कित्येक पटीने वाढते. मोड येण्याच्या प्रक्रियेत त्यातील प्रथिने, बी-कॉम्प्लेक्स, अँटिऑक्सिडंट्स आणि एन्झाइम्स अधिक सक्रिय होतात. कच्चे कडधान्य पचायला जड असते, पण मोड आल्यावर ते पचायला हलके होते आणि शरीराला त्यातील पोषण लवकर मिळते.
मोड आलेले हिरवे मूग - 1 वाटी, मोड आलेले हरभरे - 1 वाटी, मक्याचे दाणे, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, काकडी, हिरवी मिरची, चवीनुसार सेंधा नमक, चाट मसाला, लिंबाचा रस आणि थोडे पाणी.
बनवण्याची सोपी कृती:
सर्वात आधी हिरवे मूग आणि हरभरे रात्रभर पाण्यात भिजवून त्यांना चांगले मोड आणून घ्या. आता हे मोड आलेले मूग, हरभरे आणि मक्याचे दाणे प्रेशर कुकरमध्ये थोडे पाणी घालून एक शिट्टी होईपर्यंत उकडून घ्या. जास्त शिजवू नका. नंतर हे मिश्रण गाळणीत ओतून त्यातील सर्व पाणी काढून टाका. आता हे मिश्रण एका मोठ्या बाऊलमध्ये काढा. त्यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, काकडी आणि हिरवी मिरची घाला. वरून चवीनुसार सेंधा मीठ, चाट मसाला आणि लिंबाचा रस घालून मिक्स करा. तुमची झणझणीत आणि पौष्टिक स्प्राऊट्स चाट तयार !
1) प्रथिनांचा पॉवरहाऊस: शाकाहारी लोकांसाठी प्रोटीनचा हा सर्वोत्तम स्रोत आहे.
2) वजन नियंत्रण: यात फायबर जास्त असल्याने पोट जास्त वेळ भरलेले राहते, त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
3) पचन सुधारते: फायबरमुळे पचनक्रिया सुरळीत होते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.
4) इम्युनिटी बूस्टर: यातील अँटिऑक्सिडंट्स रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.
सोशल मीडियावर अनेकदा सांगितले जाते की, मधुमेहींनी आंबा, केळी, चिकू, द्राक्षे यांसारखी फळे रिकाम्या पोटी खाल्ल्याने शुगर वाढत नाही. हा सल्ला पूर्णपणे चुकीचा ठरू शकतो. या फळांमध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे रिकाम्या पोटी खाल्ल्यास रक्तातील साखर झपाट्याने वाढू शकते. त्यामुळे कोणताही सल्ला घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. तसेच सेंधा मीठ चांगले असले तरी त्यातही सोडियम असतेच. त्यामुळे उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांनी कोणतेही मीठ कमी प्रमाणातच वापरावे. योग्य आहार आणि व्यायाम याने मधुमेह नक्कीच नियंत्रणात राहील.