पुणे : शिक्षण क्षेत्रातील अभ्यासक, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी पूर्णवेळ कार्यकर्ते आणि मुख्यमंत्री कार्यालयातील विशेष अधिकारी डॉ. श्रीपाद ढेकणे (वय ६२) यांचे अल्पशा आजाराने आज निधन झाले.
विद्यार्थी चळवळ, अध्यापन, राजकीय-संघटनात्मक कार्य आणि राज्याच्या शिक्षणविषयक धोरण प्रक्रियेत त्यांनी दीर्घकाळ काम केले.
ढेकणे यांनी १९८३ मध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून सार्वजनिक जीवनाला सुरुवात केली. विद्यार्थी कार्यकर्ता, भागप्रमुख आणि महाविद्यालय प्रमुख अशा जबाबदाऱ्या सांभाळल्यानंतर पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून ते परिषदेचे पूर्णवेळ कार्यकर्ते झाले. पुणे ग्रामीण जिल्हा विस्तारक, सोलापूर जिल्हा संघटनमंत्री, शिवाजी विद्यापीठ संघटनमंत्री तसेच कोकण आणि गोवा संघटनमंत्री म्हणून त्यांनी काम केले. शहर कार्यकारिणीपासून प्रांत आणि केंद्रीय कार्यकारिणीपर्यंत एक दशकाहून अधिक काळ त्यांनी विविध संघटनात्मक जबाबदाऱ्या सांभाळल्या.
पूर्णवेळ कार्यानंतर ढेकणे खडकी येथील टी. जे. महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू झाले. अध्यापन करतानाही त्यांचा विद्यार्थी चळवळीशी संपर्क कायम राहिला. अभाविपच्या पुणे शाखेचे प्रमुख म्हणून त्यांनी दीर्घकाळ काम केले. भारतीय मजदूर संघाशी संबंधित श्रम सेवा न्यासाच्या ‘विमर्श’ या नियतकालिकाच्या संपादकीय मंडळातही ते कार्यरत होते.
ढेकणे यांनी प्राध्यापकी करत असतानाच पीएच.डी. पूर्ण केली. महानगरपालिकांच्या अंदाजपत्रकांचा तौलनिक अभ्यास हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता. पुढे त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या पुणे शाखेचे प्रवक्ते म्हणूनही काम केले. लोकसभा, विधानसभा आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांमध्ये त्यांनी विविध संघटनात्मक जबाबदाऱ्या सांभाळल्या.
राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर तत्कालीन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या कार्यकाळात ढेकणे शिक्षण मंत्रालयात विशेष अधिकारी म्हणून कार्यरत होते. विद्यापीठ कायद्यातील बदल, खासगी विद्यापीठ कायदा तसेच शालेय शिक्षण, ग्रंथालये आणि प्राथमिक शिक्षकांशी संबंधित प्रश्नांवर त्यांनी काम केले.
पुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात विशेष अधिकारी म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. या काळात त्यांचा शिक्षणविषयक कामकाजावर विशेष भर होता. राष्ट्रीय शिक्षण धोरणाची महाराष्ट्रात शालेय स्तरावर अंमलबजावणी करण्याच्या प्रक्रियेत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. बालभारती, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद आणि शालेय शिक्षण विभाग यांच्यात समन्वय साधण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले.
शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे आणि शिक्षण विभागातील विविध यंत्रणांशी समन्वय साधत राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीसह शिक्षण क्षेत्रातील विविध विषयांवर ते अखेरपर्यंत कार्यरत होते.
त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली, एक जावई, नातवंडे असा परिवार आहे.