व्यक्तिविशेष : शेतातून मंत्रालयापर्यंत ! दोन एकर जमीन विकून समाजासाठी लढणारा 'झुंजार योद्धा' मनोज जरांगे पाटील ! - टॉप न्यूज मराठी

व्यक्तिविशेष : मराठा आरक्षण आंदोलनाचा चेहरा म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्र ज्या व्यक्तीला ओळखतो, त्यांचा नाव आहे मनोज जरांगे पाटील. साधी राहणी, थेट बोलणं आणि कोणत्याही राजकीय दबावाला न झुकण्याची वृत्ती यामुळे ते लाखो तरुणांचे नेते बनले आहेत.

जन्म आणि कौटुंबिक पार्श्वभूमी

मनोज जरांगे पाटील यांचा जन्म 1 ऑगस्ट 1982 रोजी बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील मातोरी या छोट्याशा गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रावसाहेब जरांगे आणि आईचे नाव प्रभावती जरांगे. शेतकरी कुटुंबात जन्मलेले मनोज हे चार भावंडांपैकी सर्वात लहान. त्यांना जगन्नाथ आणि काकासाहेब असे दोन मोठे भाऊ आहेत. त्यांचे कुटुंब शेतीवर उदर्निर्वाह करतात. 

त्यांचा विवाह सुमित्रा जरांगे यांच्याशी झाला असून त्यांना शिवराज हा एक मुलगा आणि वैष्णवी, प्रणाली, पल्लवी अशा तीन मुली आहेत. लग्नानंतर ते जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंकुशनगर / शहागड येथे स्थायिक झाले.

शिक्षण - 12वी पर्यंत, पण ज्ञान अफाट

जरांगे पाटील यांचे शिक्षण 12 वी पर्यंत झाले आहे. त्यांनी जिल्हा परिषद शाळा मातोरी आणि नंतर आर. बी. अटल कॉलेज, गेवराई येथून शिक्षण घेतले. एका मुलाखतीत ते स्वतः म्हणाले होते, "मी खूप माहितीपूर्ण बोलतो म्हणून लोकांना वाटते मी खूप शिकलोय, पण मी 12 वी शिकलोय. मी वाचन खूप करतो." शिक्षण कमी असले तरी महापुरुषांची पुस्तके वाचण्याची त्यांना प्रचंड आवड आहे. असते ते सांगतात. 

घरची परिस्थिती बेताची असल्याने त्यांनी हॉटेलमध्ये कॅशिअर म्हणून आणि अंबड येथील साखर कारखान्यातही काम केले आहे.

कारकीर्द - शिवबा संघटनेपासून एल्गारापर्यंत

  • जरांगे यांनी सुरुवातीला काँग्रेसमध्ये युवक अध्यक्ष म्हणून काम केले, पण 2004 नंतर ते बाहेर पडले. शेतकरी आणि मराठा तरुणांचे प्रश्न जवळून पाहिल्यावर 2011 मध्ये त्यांनी 'शिवबा संघटना' स्थापन केली.

  • 2012 पासून ते मराठा आरक्षणासाठी सक्रिय आहेत. 2013 मध्ये पाण्यासाठी आंदोलन, 2021 मध्ये सुप्रीम कोर्टाने आरक्षण रद्द केल्यानंतर साष्ट-पिंपळगाव येथे 3 महिन्यांचे ठिय्या आंदोलन त्यांनी केले.

  • त्यांच्याकडे संघटना चालवायला पैसे नव्हते तेव्हा त्यांनी स्वतःची 2 एकर शेती विकली आणि घरही तारण ठेवले होते, असे त्यांचे सहकारी सांगतात. आजपर्यंत त्यांनी 30 ते 35 पेक्षा जास्त आंदोलने केली आहेत.

2023 चा टर्निंग पॉईंट

1 सप्टेंबर 2023 रोजी अंतरवाली सराटी येथे त्यांच्या उपोषणावर पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि त्यानंतर मनोज जरांगे हे रातोरात महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले. तेव्हापासून त्यांनी 6-7 वेळा आमरण उपोषण केले. त्यांची मागणी स्पष्ट आहे - सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन OBC मधून आरक्षण द्यावे.

आज त्यांची ओळख एका सामान्य शेतकऱ्यापासून 'संघर्षयोद्धा' अशी झाली आहे, ज्याच्याकडे स्वतःची चारचाकीही नाही, पण ज्याच्या एका हाकेवर लाखो मराठा बांधव मुंबईकडे निघतात.

 माहिती स्रोत - इंटरनेट