‘खेलो इंडिया’ संवादात टी. जे.चा ठसा ; पुणे जिल्ह्यातून दोनच महाविद्यालयांची निवड - टॉप न्यूज मराठी

पुणे : केंद्र सरकारच्या युवा व क्रीडा मंत्रालयांतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘माय भारत’ उपक्रमात खडकीच्या टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयाने ठसा उमटवला. या उपक्रमातील ‘खेलो इंडिया संवाद’ कार्यक्रमात पंतप्रधानांशी संवाद साधण्यासाठी पुणे जिल्ह्यातून फक्त दोनच महाविद्यालयांची निवड करण्यात आली होती. त्यात गुरुवारी ‘टीजे’च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.  

राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून देशभर या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी महाराष्ट्रातून काही महाविद्यालयांची निवड करण्यात आली होती. मात्र, पुणे जिल्ह्यातून खडकीचे टी. जे. महाविद्यालय व पिंपरीचे अजिंक्य डी. वाय. पाटील महाविद्यालय या दोनच महाविद्यालयांची निवड करण्यात आली होती.  

या प्रसंगी खडकी शिक्षण संस्थेचे सचिव आनंद छाजेड, औंध-बोपोडी प्रभागाच्या नगरसेविका सपना छाजेड, संस्थेचे सीईओ उत्तमकुमार इंदोरे, संचालक ॲड. अजय सूर्यवंशी, रमेश अवस्थे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे, उपप्राचार्य प्रा. राजेंद्र लेले, IQAC विभागाच्या प्रमुख डॉ. गौरी माटेकर, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. अर्चना तारू, प्रा. ज्योती वाघमारे आदी उपस्थित होते. पंतप्रधानांच्या संवादानंतर पॅरा वर्ल्डकप शूटिंग विजेते संतोष गाडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 

‘देशातील युवकांनी क्रीडा, तंदुरुस्ती आणि शिस्त यांचा जीवनात स्वीकार करून सक्षम व विकसित भारताच्या उभारणीत योगदान द्यावे,’ असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना केले. भारताच्या क्रीडा क्षेत्रात झालेली प्रगती, युवा प्रतिभेला मिळणारे प्रोत्साहन आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची वाढती कामगिरी याविषयी त्यांनी प्रेरणादायी विचार मांडले.